ऊसतोड मजुरांना मिळणार कारखान्यावर शिधा…
ऊसतोड मजुरांना मिळणार कारखान्यावर शिधा....

कळंब प्रतिनिधी: आता जिल्ह्यातील ऊसतोड मजूर यांना सार्वजनिक वितरण प्रणाली द्वारे योजना निहाय स्वस्त धान्य कारखाना परिसरात स्वस्त धान्य दुकान उभारून त्याद्वारे वितरण करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील बहुतांश ऊसतोड कामगार हा जिल्हा बाहेरील व राज्याबाहेरील स्थलांतरित मजूर आहे, या मजुरांची स्वस्त धान्याच्या उपलब्धतेसाठी होणारी अडचण व धान्यापासून वंचित राहण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी महोदय यांनी जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यावर स्वस्त धान्य दुकान स्थापित करून त्याद्वारे ऊसतोड कामगारांना त्यांच्या योजनेनुसार स्वस्त धान्य कारखाना परिसरातच उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला, व त्यानुसार कार्यवाही करण्यात आलेली आहे.
याचाच एक भाग म्हणून आज रांजणी ता. कळंब येथील नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज या साखर कारखान्यावर स्वस्त धान्य दुकानांचे उद्घाटन करण्यात आले, या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते ऊसतोड मजुरांना प्रतिनिधिक स्वरूपामध्ये धान्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितांमध्ये श्रीमती स्वाती शेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी,उस्मानाबाद श्रीमती. अहिल्या गाठाळ उपविभागीय अधिकारी, कळंब कृषीरत्न श्री. बी बी ठोंबरे, संस्थापक चेअरमन तसेच तहसीलदार मुस्तफा खोंदे हे उपस्थित होते.
या वेळी कळंब तालुक्यातील ऊसतोड मजुरांना ओळखपत्र वाटप करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती स्वाती शेंडे यांनी केले तर कृषिरत्न ठोंबरे व जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले शेवटी आभार प्रदर्शन तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी केले. कार्यक्रमास कारखाना व्यवस्थापन चे अधिकारी, कर्मचारी, मुकादम व मोठ्या संख्येने ऊसतोड कामगार उपस्थित होते.
