श्री तुळजा भवानीच्या आठ दिवशीय मंचकी निद्रेस प्रारंभ

श्री तुळजा भवानीच्या आठ दिवशीय मंचकी निद्रेस प्रारंभ
उस्मानाबाद: तुळजापूर शारदीय नवरात्राच्या अनुषंगाने अष्टमीच्या मुहुर्तावर महाराष्ट्राचे कुलदैवत आई तुळजा भवानीच्या आठ दिवसीय मंचकी निद्रेस बुधवारी सायंकाळी प्रारंभ झाला. तत्पूर्वी सकाळच्या पंचामृत अभिषेक पुजेनंतर दैनंदिन विधी पार पडले.त्यानंतर मंचकावरील देवीनिद्रेच्या नवीन गादीचा कापुस सुवासिनी व आराधी महिलांनी देवीगीत गात वेचुन काढला त्यानंतर मंचकावरील गादी तयार करण्यात आली.
दरम्यान सेवेकरी पलंगे व इतरांनी देवीनिद्रेचा मंचक व मंचककक्ष धुवून व पुसुन स्वच्छ करून त्यावर गादीचादर टाकुन देवीच्या निद्रेसाठी सज्ज केला, सायंकाळी साडेसहा वाजता अभिषेक घाट होऊन नित्यनेमाने देवीस पुजेसाठी हाक मारण्यात आली. सिंहासनावरील मेण भोपे पुजारी यांनी काढून सिंहासनापाशी जावुन निर्माल्य विसर्जन केले, सात वाजता भोपी पुजाऱ्यांनी पंचामृत व शुद्धजल स्नान घालुन मेण काढणेविधी केला.
यानंतर शासकीय आरती व मानाची आरती होऊन नैवेद्य दाखविण्यात आला. या विविध विधी नंतर सिंहासनावरून देवीच्या मुर्तीस उपस्थित भोपीपुजारी बांधवांनी निद्रेसाठी मंचकी आणले. यावेळी उपस्थित महंत, पुजारी, सेवेकरी व कर्मचारी यांनी आई राजा उदो उदो चा जयघोष करीत भंडाऱ्याची उधळण केली व तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला.
देवीच्या निद्रेनंतर शासकीय आरती व मानाच्या आरत्या धुपारती नैवेद्द हे विधी पार पडले.प्रक्षाळ पुजा, नैवद्य हे विधी झाल्यानंतर शेजारती झाली. यावेळी श्री तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, चारी महंत, मंदिर व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतोले, सुधीर कदम, अतुल मलबा, संजय परमेश्वर, अजित कदम, विकास मलबा, पृथ्वी मलबा, स्वराज परमेश्वर, अविराज मलबा, प्रशांत सोंजी, सचिन परमेश्वर, शशीकांत कदम, शिवाजी कदम, आण्णासाहेब सोंजी, बाबासाहेब मलबा, सेवेकरीपलंगे, पवेकर, छत्रे, चोपदार, गोंधळी, इ. जणासह पोलिस-सुरक्षा अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.