लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा : वडकीमध्ये मध्यरात्री घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : चोरट्यांनी काठीने मारहाण करीत कोयत्याच्या धाकाने २५ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम व इतर साहित्य अशा एकूण ६१ हजार रुपयांचा ऐवजावर डल्ला मारला. ही घटना वडकी (ता. हवेली) येथे रविवारी (दि. १० ऑक्टोबर) घडली. कोणीही मदतीला येऊ नये म्हणून शेजारच्या घराच्या बाहेरून कडी लावून दरवाजे बंद केले होते.
सुभाष सोमाजी मोडक (वय ५५, रा. वडकी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, वडकी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, रविवारी मोडक कुटुंबीय जेवण करून रात्री ९ च्या सुमारास झोपले, त्यानंतर मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास चोरटे दिसताच पत्नी कांताया ओरडल्या. यावेळी चोरट्यांनी हातात कोयता व इतरांच्या हातामध्ये काठ्यांचा धाक दाखवून कांता यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील वेल काढून घेतले. मोडक यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी कोयत्याने मारण्याचा इशारा केला.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.
