आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दहशत माजविणाऱ्या आवेज शेख वर स्थानबध्दतेची कारवाई

पी.सी.बी. गुन्हे शाखेची कामगिरी

पुणे: समर्थ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, आवेज शेख या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.

पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आवेज शेख, (वय २२ वर्षे, रा. बाबुभाई वाडा, सागर हॉटेल जवळ, २७१ गणेश पेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह कोंढवा व समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अग्नी शस्त्र, कोयता, तलवार या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील २ वर्षामध्ये त्याच्याविरूध्द २ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन सुरज बंडगर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली. स्थानबध्दतेची ही ८६ कारवाई आहे.

get_footer();