आवृत्ती पुणे
← Back to Homepage

शहर-उपनगरात दुचाकीवरील चोरट्यांचा धुमाकूळ

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 3, 2021

पोलिसांची गस्त वाढवावी : ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलांमध्ये घबराटीचे वातावरण

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकीवरील चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दुचाकीवरील चोरटे रस्त्यात पादचाऱ्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून महागडे मोबाईल घेऊन पसार होत असल्याने महिला, पादचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. चोरीच्या घटना घडत असल्याने बीट मार्शल आणि गस्तीवरील पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवून भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात आहे.

गुरुवारी पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये टेम्पोचालक तरुणासह तीन महिलांच्या हातातील मोबाईल चोरट्यांनी जबरदस्तीने चोरुन नेले आहेत.

बिबवेवाडीमध्ये एका टेम्पो चालक तरुणाला चोरट्यांनी अडवून तुझे वय आहे, का टेम्पो चालवायचे थांब तु असे बोलून टेम्पोच्या खिडकीतून हात घालून १५ हजार रुपयांचा मोबाईल चोरुन नेला. ही घटना शेळके वस्ती परिसरात 31 ऑगसट रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. याप्रकरणी 35 वर्षीय तरुणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दुसरी घटना हडपसर येथील दत्त मंदीर कॉर्नर परिसरात घडली आहे. 22 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेच्या हातातील 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने हिसकावून नेला. याप्रकरणी 39 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तिसऱ्या घटनेत 37 वर्षीय महिला त्यांची लहान मुलगी आणि नणंद यांच्यासोबत सोलापूर रोडने पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्याने मुलीच्या हातातून 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला.
महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी रमेश नागेश माने (वय-19 रा. माळवाडी) या चोरट्याला अटक केली आहे.

चौथ्या घटनेत नातेवाईकांकडे जाणाऱ्या महिलेचा पाठलाग करत दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला.
हा प्रकार 24 ऑगस्टला संध्याकाळी साडेचारच्या सुमारास हांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकाजवळ घडला आहे. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शहरामध्ये मोबाईल हिसकावण्याच्या घटना वाढत असून बहुतांश प्रकरणामध्ये चोरट्यांकडून महिलांना टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या पल्लवी सुरसे आणि ललिता दिलीप तुपे यांनी केली आहे.

get_footer();