आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षांचा सश्रम कारावास

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 15, 2021

लोणावळा परिसरात घडली होती घटना : दंड न भरल्यास साधी कैदेची शिक्षा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला वेळोवेळी एकटीला बोलावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कुठे वाच्चता केल्यास तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात घडली आहे.

तीन वर्षापूर्वी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवत बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत 10 वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंड न भरल्यास 6 महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे.

आप्पा यशवंत साळवे (वय-52 रा. कुसगाव बु. लोणावळा) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2018 ते मे 2018 या कालावधीत घडला. पीडित मुलगी अनाथ असून मुलगी तिच्या चुलत आजी सोबत राहत होती. ती राहत असलेल्या बंगल्याच्या शेजारील एका बंगल्यात काम करणाऱ्या आरोपीने ओळखीचा फायदा घेत मुलीला बंगल्यात एकटीला बोलावले. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरुन 13 मे 2018 रोजी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात साळवे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक राधिका मुंडे यांनी केला. तर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी दरेकर यांनी आरोपी विरुद्ध गुन्ह्याचे दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले होते.

पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात शनिवारी (दि.13) सुनावणी झाली. या खटल्यात सरकारी वकील म्हणून प्रेमकुमार अगरवाल यांनी काम पाहिले.

get_footer();