दहशत माजविणाऱ्या समीर सावंतवर स्थानबध्दतेची कारवाई
पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : येरवडा पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
समीर सावंत, (वय-२१ वर्षे, रा. नेताजी शाळे समोर, सुभाषनगर, येरवडा) याला ताब्यात घेण्यात आले.नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले.
पुणे पोलीस आयुक्तालयातील येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा हा गुन्हेगार अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता, तलवार या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, साधी दुखापत, चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याच्याविरूध्द ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करणेस धजावत नव्हते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशनचे बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखेचे चंद्रकांत बेदरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली. स्थानबध्दतेची ही ७५ कारवाई आहे.
