विशेष सरकारी वकील पदमश्री उज्ज्वल निकम यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ प्रदान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : नुकताच विशेष सरकारी वकील पदमश्री उज्ज्वल निकम यांनी सूर्यदत्त लॉ कॉलेज च्या शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला . प्रसंगी ‘सूर्यदत्त’च्या वतीने विशेष सरकारी वकील पदमश्री उज्ज्वल निकम यांना लोकसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल ‘सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ने सन्मानित करण्यात आले. या अगोदर २०१० मध्ये त्यांना सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारताचा नकाशा असलेले सन्मानचिन्ह, विद्यार्थ्यांनी बनवलेला विशेष स्कार्फ, सुवर्णपदक व सन्मान पत्र असे या सन्मानाचे स्वरूप आहे. प्रा डॉ संजय बी चोरडिया संस्थापक व अध्यक्ष सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन पुणे यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. मिथिलेश वर्मा प्राचार्य सूर्यदत्त लॉ कॉलेज, प्रा केतकी बापट, प्रा मोनिका सेहरावत उपस्थित होते.
यापूर्वी सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार हा पुरस्कार माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, शास्त्रज्ञ डॉ. के. सिवन, सामाजिक कार्यकर्ते वजुभाई वाला, लेफ्ट. जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, श्याम जाजू, खासदार सुप्रिया सुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. श्रीरंग लिमये, डॉ. शकुंतला काळे, पोलीस अधिकारी संजय जाधव, चंद्रशेखर सावंत, डॉ. चंद्रकांत कोकाटे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी मान्यवरांना प्रदान करण्यात आलेला आहे.
विशेष सरकारी वकील पदमश्री उज्ज्वल निकम यांनी जळगाव येथील शाळा, महाविद्यालय, वकिलीचा अभ्यास, विविध दाव्यामध्ये आलेले अनुभव आणि या सर्वातून झालेली ज्ञानप्राप्ती हा जीवनप्रवास विद्यर्थ्यांसमोर उलगडला. ते म्हणाले, “वकील होण्याची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे विशेष सरकारी वकील होईन आणि उत्कृष्ट कामगिरी करेन असे काही ध्येय समोर नव्हते . परंतु समोर आलेल्या संधीचे सोने केले असे मात्र मी म्हणू शकेन. सामान्य माणूस तर्कसंगत बोलू लागल्यास आपण त्याला म्हणतो की वकीलसारखा बोलू लागलास. म्हणजेच तर्कसंगत बोलणे हे वकिलीसाठी आवश्यक आहे.” विशेष सन्मानाबद्दल त्यांनी सूर्यदत्त चे आभार मानले तसेच प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना कायदा क्षेत्रातील प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी बोलताना सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “भारताच्या कायदेविषयक इतिहासात पद्मश्री उज्ज्वल निकमजी यांचे नाव सुवर्ण शब्दात लिहिले जाईल. विशेष सरकारी वकील तसेच उत्तम माणूस म्हणून त्यांची नोंद घेण्यात येईल . अत्यंत कठीण खटले लढण्यासाठी ते ओळखले जातात, प्रामुख्याने त्यांनी खून आणि दहशतवादाच्या प्रकरणांवर काम केले आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण आणि 2008 च्या मुंबई हल्ल्यातील संशयितांवर खटला चालवण्यास त्यांनी मदत केली.
2013 च्या मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण, 2016 कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यातही ते विशेष सरकारी वकील होते. 26/11 च्या मुंबई हल्ल्याच्या खटल्यात राज्याच्या वतीने वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला. आणि, सर्व प्रकरणांमध्ये, वकील देशाची वा कशी करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी सत्य समोर आणले आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यात मदत केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचा ‘सूर्यदत्त सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात येत आहे.”
