आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वकील महिलेला खंडणी मागणारे सराईत जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 18, 2021

गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी : दोघे लष्कर पोलीस स्टेशनच्या ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वकील महिलेला खंडणी मागणाऱ्या दोघा सराईतांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट एकला यश मिळाले असून, आरोपींना पुढील कारवाईसाठी लष्कर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी एक महिला तक्रारदार या त्यांच्या दुचाकीवर आशियाना अपार्टमेंट पूना कॉलेजसमोर भवानी पेठ पुणे येथे त्यांच्या मालकीच्या असलेल्या झेरॉक्स दुकानामध्ये झेरॉक्स काढून परत आल्या असता, सनी म्हेत्रे नावाच्या इसमाने गाडी पार्किंग करण्याचे पैसे मागितले. त्यावेळी आमचे स्वतःचे झेरॉक्सचे दुकान आहे, मी दिवसातून तीन ते चार वेळा दुकानात येते. मी हे रोज कोणाकोणाला सांगू, असे म्हटले असता बॅरेकेट लावून त्यांची गाडी अडवून ‘तेरी कोनसी दुकान है मुझे बता, हमको पैसे दो नही तो तुम्हारी दुकान फोड दुँगा, नहीं तो तुमको भी नहीं छोडुंगा’ असे म्हटल्याबद्दल आरोपी सनी म्हेत्रे, सागर बग्गन आणि त्यांच्या इतर दोन साथीदार यांच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

शनिवारी १६ ऑक्टोबर रोजी युनिट १, गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील अधिकारी व कर्मचारी असे युनिट-१ च्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी सनी म्हेत्रे व सागर बग्गन हा पूना कॉलेज गेटसमोर भवानी पेठ पुणे येथे येणार आहे. याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन परवानगीने युनिट १, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमीप्रमाणे जाऊन नमुद आरोपींना ताब्यात घेतले.

सनी ऊर्फ दशरथ श्याम म्हेत्रे (वय ३२, रा. भवानी पेठ, पुणे), सागर राजू बग्गन (वय ३३, रा. मोझे वस्ती, लोहगाव, पुणे) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडे लष्कर पोलीस स्टेशनकडील वरील दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने त्यांस विश्वासात घेऊन तपास केला असता, त्यांनी दाखल गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबूल केल्याने आरोपीस पुढील कारवाई कामी लष्कर पोलीस स्टेशन, पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपींवर अमली पदार्थ तस्करी, जबरी चोरी, मारामारी असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहरचे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, महेश बामगुडे, तुषार माळवदकर यांनी केली आहे.

get_footer();