आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जेलमध्ये असतानाची हप्ता वसुली बुडाली

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 19, 2021

कोंढवा पोलिसांत गुन्हा : बाहेर आल्यानंतर पानटपरी चालकाच्या खूनाचा प्रयत्न

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पोलिसांनी आरोपीला खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. त्यामुळे त्याचा पाच ते सहा महिने कारागृहात मुक्काम होता. आता जामिनावर सुटल्यानंतर या मधल्या काळातील थकलेला हप्ता देण्याची मागणी त्याने दुकानदारांकडे केली. पान टपरी चालकाने हप्ता देण्यास नकार दिल्याने त्याने साथीदारांच्या मदतीने या पान टपरीचालकावर तलवारीने वार करुन त्याच्या खूनाचा प्रयत्न केला.

मंगेश अनिल माने (वय २३, रा. सुखसागरनगर), अखिलेश ऊर्फ लाड्या कलशेट्टी (रा. गोकुळनगर) सुरज बोकेफोडे (रा. माऊलीनगर), सागर जाधव (रा. सुखसागरनगर) आणि त्याच्या दोन साथीदारांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल रमेश चव्हाण (वय २०, रा. अप्पर इंदिरानगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश माने हा सराईत गुंड असून बिबवेवाडी पोलिसांनी त्याला खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यात तो पाच ते सहा महिने कारागृहात होता. तो नुकताच जामिनावर बाहेर आला आहे. अनिल चव्हाण यांची कोंढव्यातील साळवे गार्डन येथे पान टपरी आहे. त्याने फिर्यादी अनिल चव्हाण यांची भेट घेतली. पान टपरी सुरु ठेवायची असेल तर तो कारागृहात असलेल्या काळातील थकलेले हप्ते दे, अशी मागणी केली. पैसे देण्यास चव्हाण यांनी नकार दिल्याने माने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तलवारीने वार केला. त्याला सोडविण्यासाठी आलेल्या मित्रावरही तलवारीने वार केले. कोंढवा पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील तपास करीत आहेत.

get_footer();