आवृत्ती पुणे
← Back to Homepage

उच्च प्रतीच्या स्कॉच व व्हिस्कीच्या बाटलीत भेसळ करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 10, 2021

सहा लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त : राज्य उत्पादन शुल्क विभागाची पिंपळे सौदागरमध्ये धडक कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दिवाळी व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट स्कॉच व व्हिस्की दारूच्या ६५ बाटल्या सुमारे ६ लाख ७१ हजार ८९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ९ नोव्हेंबर २०२१ रोजी पिंपळे सौदागर गावच्या हद्दीत धडक कारवाई करीत एकाला अटक केली.

कांजी शामजी पटेल असे अटक केलेल्याचे नाव आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप, संचालक अंमलबजावणी व दक्षता उषा वर्मा, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक एस. आर. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क -ई विभागाचे निरीक्षक यांच्या पथकाने पिंपळे सौदागर येथे छापा टाकला. उच्च प्रतीच्या स्कॉचच्या रिकाम्या बाटल्यामध्ये कमी प्रतीचे विदेशी मद्य भरत असताना आढळून आले.

तेथे झडती घेतली असता डीएसपी, रिया- रेड लेबल, रॉयल चॅलेंज- ब्लॅक लेबल, जॅक डॅनियल, चिव्हाज रिगल, सिग्नेचर- सिगल माल्ट व्हिस्की, व्हाईट फिल- ग्रे कोस, ॲब्ल्युलेट व्होडका अशा विविध ब्रँडच्या उच्च प्रतीच्या स्कॉचच्या १ लि. क्षमतेच्या ६५ बाटल्या आणि विविध ब्रँडच्या उच्च प्रतीच्या स्कॉचच्या ७२४ रिकाम्या बाटल्या, बुचे, लेबले आदी साहित्य असा एकूण सहा लाख ७१ हजार ८९५ रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. आरोपीला ताब्यात घेऊन अटक करीत त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

अधीक्षकाबरोबर निरीक्षक एस.परळे, पी. एस. सेतसंदी, एन. आर. मुंजाळ, दुय्यम निरीक्षक व कर्मचारी एस. वाय. दरेकर, डी. बी. गवारी, एन. यू. जाधव, ए. आर. दळवी, एन. एस. पिंगळे, समीर बिरांजे, राटू पोटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. निरीक्षक एस.परळे पुढील तपास करीत आहेत.

जागा भाड्याने दिल्यानंतर सावध राहावे…

स्वस्त व घरपोच मिळणारे मद्य बनावट, भेसळीचे किंवा कमी दर्जाचे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच मद्य खरेदी करावे. तसेच काही नागरिक भाडेकराराने जागा घेऊन बनावट मद्य निर्मिती करणे, अवैधरित्या मद्य साठवणूक करणे असे बेकायदेशीर व्यवहार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जागा मालकांनी भाडेकरू बेकायदेशीर मद्याच्या व्यवसायात सामिल नसल्याचे वेळोवेळी खात्री करावी. तसेच बेकायदेशीर मद्य व्यवसायात सामील असणाऱ्यांची माहिती स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा पोलिसांना कळवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस.परळे यांनी केले आहे.

get_footer();