आवृत्ती पुणे
← Back to Homepage

घरफोडीच्या गुन्ह्यातील वॉचमनला जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 13, 2021

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : १५ हजार रुपयांचा ऐवज जप्त

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

शहरात घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, सुरक्षारक्षकानेच चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. घरफोडी गुन्ह्यात सहभागी असलेल्या वॉचमनला गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

अमर गजानन सुर्यवंशी (वय-48 रा. शास्त्रीनगर, मुठेश्वर कॉलनी, कोथरुड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्राची अनिल कडु (वय-27 रा. भैरवी बिल्डिंग, कोथरुड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, प्राची कडु या कर्वे रोड येथील आयडीया वोडाफोन स्टोअरमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. तर आरोपी हा याठिकाणी सात वर्षापासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. 13 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत ऑफिस बंद असताना चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून ऑफिसमधील लॅपटॉप, मोबाईल फोन, कॅमेरा असा 21 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता.

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-१चे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शशिकांत दरेकर व दत्ता सोनवणे यांना कर्वेरोड येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक सूर्यवंशी याचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुर्यवंशी याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला डेक्कन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीला न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

प्रभारी अपर पोलीस आयुक्त भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार सतिश भालेकर, अजय थोरात, शशिकांत दरेकर, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();