आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जाणून घेऊया, कॉपीराइट कायद्याविषयी…!

maharashtra jain warta • News Slider, Social • July 15, 2021

पुणे : संकेत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

1914 साली ‘इंडियन कॉपीराइट अ‍ॅक्ट’ कायदा प्रथम अस्तित्वात आला. 1957 मध्ये ‘द कॉपीराइट अ‍ॅक्ट 1957’ असे त्याचे नामकरण केले. तेव्हापासून 1994 पर्यंत त्यात वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या कायद्याविषयी माहिती.

कोणतीही स्वतंत्र निर्मिती म्हणजे कलाकृती, रंगमंचीय आविष्कार, संगीत आदी तयार केल्यावर त्याचा कॉपीराइट त्याच्या कर्त्यांला मिळतो. त्यासाठी लेखी करारच केला पाहिजे असे बंधन नाही. पुस्तकावर लेखक, प्रकाशक यांचे नाव असेल तरी त्यांना हा हक्क निसर्गत: मिळतो. छापील माध्यम नसेल तेव्हा त्याचा करार करून घ्यावा. स्वतंत्र बौद्धिक प्रयत्नातून जे काही तयार होते, त्याचा स्वामित्व हक्क त्याच्या कर्त्यांकडेच असतो. त्याने इतर कुणाला लेखी कराराद्वारे वा इतर मार्गाने तो दिला असला, त्याचा योग्य तो मोबदला घेतला असला तरी त्याचा निर्मितीकर्त्यांचा मूळ हक्क कायम राहतो. मूळ कृतीत बदल करणे, त्यात काटछाट करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे त्या कृतीला बाधा येत असेल वा, त्यायोगे कर्त्यांच्या प्रतिष्ठेला वा कीर्तीला धक्का बसत असेल तर, अशा प्रती प्रकाशित करण्यास आणि त्याचे वितरण करण्यास कर्ता कायद्याने रोखू शकतो किंवा संबंधितांकडे नुकसानभरपाईही मागू शकतो. मूळ कर्त्यांच्या निधनानंतर त्याचे वारसदारही हा हक्क बजावू शकतात. लेखकाच्या निधनानंतर 60 वर्षांनी त्याचा वा त्याच्या वारसदारांचा त्या पुस्तकावरील हक्क संपुष्टात येत असला तरी त्यावरील हक्क शाबूत राहतो. कॉपीराइट कायदा हा मूळ लेखकाच्या वा कर्त्यांच्या हक्काचे संरक्षण करणारा कायदा आहे. त्यामुळे इतर कुणालाही परवानगीशिवाय त्याचा वापर वा गैरवापर करता येत नाही. त्याचा भंग केल्यास दिवाणी व फौजदारी या दोन्ही कायद्याप्रमाणे कारवाई करता येते. तो सिद्ध झाल्यास सहा महिने ते तीन वर्षे तुरुंगवास किंवा 50 हजार ते दोन लाख रुपये दंड होऊ शकतो. बौद्धिक संपदा ज्याची त्याची वैयक्तिक संपत्ती असते. तो त्याचा एकमेव हक्कदार असतो. त्यांनी त्यांचे हक्क इतर कुणाला दिले तरीसुद्धा त्याचा पूर्णत: वा अंशत: वापर करण्यासाठी मूळ कर्त्यांची आणि ज्याच्याकडे सध्या त्याचे मुखत्यारपत्र असेल त्यांची परवानगी अनिवार्य असते. याचा अर्थ असा नाही की, संशोधन वा इतर प्रकारच्या लेखनासाठी इतरांच्या लेखनातील उद्धृते, उतारे वा काही भाग वापरताच येत नाही. मर्यादित उद्दिष्टांसाठी आणि योग्य कारणासाठी असा वापर अवश्य करता येतो, पण ते कसे वा किती प्रमाणात वापरायचे हे समजून घेतले पाहिजे.

get_footer();