आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कॅनडात नोकरी लागल्याचे सांगून लोहगाव विमानतळात शिरणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 12, 2021

सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे पकडला गेला : बनावट व्हिसा, विमान तिकीट बनवून गैरवापर

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : नोकरी गेल्याने त्याला अमेरिकेहून घरी यावे लागले होते. आई वडिलांना दाखविण्यासाठी त्याने कॅनडात नोकरी लागल्याचे सांगितले. बनावट तिकीट व व्हिसाही तयार केला. आपण खरेच कॅनडाला जात असल्याचे दाखविण्यासाठी त्याने पुण्याच्या लोहगाव विमानतळावर प्रवेशही केला. तेथून बाहेर पडत असताना सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्याने तो अडकला. बनावट तिकीट व कॅनडाचा बनावट व्हिसा तर करुन त्याचा गैरवापर करणाऱ्या एका ३० वर्षाच्या तरुणाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी लोहगाव विमानतळावरील शिफ्ट इन्चार्ज अरविंदकुमार सिंग यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, औंध येथे राहणाऱ्या एका ३० वर्षाच्या तरुणाची २०१९ मध्ये नोकरी गेली. त्यामुळे त्याला अमेरिकेहून परत पुण्याला यावे लागले होते. त्यानंतर काही महिन्यातच लॉकडाऊन सुरु झाले. त्यामुळे त्याला कोठेही नोकरी न मिळाल्याने गेली २ वर्षे तो घरीच होता.
आपण आई वडिलांवर बोझ बनलो आहोत, अशी खंत त्याच्या मनात लागून राहिली होती. त्यामुळे त्याने घरी कॉम्प्युटरवर कॅनडाचा बनावट व्हिसा तयार केला. तसेच पुणे ते दिल्ली व दिल्ली ते व्हॅनकुवर (कॅनडा) असे एअर इंडियाचे बनावट तिकीटही तयार केले.

आपल्या आईवडिलांना त्याने आपल्याला नोकरी लागल्याचे व आपण कॅनडाला जात असल्याचे सांगितले. त्यामुळे आई वडिलांना आनंद झाला. ९ डिसेबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास या तरुणाचे आई-वडिल त्याला सोडण्यासाठी विमानतळावर आले. त्यामुळे त्याला विमानतळामध्ये प्रवेश करावा लागला.

दुपारी साडेचार ते सायंकाळी सव्वासात वाजेपर्यंत तो विमानतळाच्या लॉबीतच थांबून राहिला. त्यानंतर तो पुन्हा आत प्रवेश करताच, तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा सुरक्षा रक्षकांना संशयास्पद वाटले. त्यांनी चौकशी केल्यावर त्याच्याकडील तिकीट व व्हिसा बनावट निघाला. त्यानंतर त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. सहायक पोलीस निरीक्षक पाठक तपास करीत आहेत.

get_footer();