आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खुनाची सुपारी घेणारे दोघे कोंढवा पोलिसांच्या जाळ्यात

maharashtra jain warta • News Slider, Police • July 21, 2021

वेळीच ताब्यात घेतल्याने वाचले एकाचे प्राण : जेलमधून कोविड-19 रजेवर असणार्‍या दोघांचे कृत्य

पुणे : अभिजीत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

येरवडा जेलमधून कोविड-19 रजेवर असणार्‍या दोन आरोपींनी एकाच्या खुनाची सुपारी घेतली. मात्र खून करण्याआधीच कोंढवा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने एकाचे प्राण वाचले आहेत. आरोपींकडून तीन गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे कौतुक केले आहे.

दि. 14 जुलै रोजी कोंढवा पोलीस ठाण्याकडील तपासपथकातील पोलीस अंमलदार सुशील धिवार यांना माहिती मिळाली की, सध्या येरवडा जेलमधून कोविड-19 रजेवर असणारा एक आरोपी आणि त्याच्या एका मित्राने कोणाचा तरी खून करण्याची सुपारी घेतली असून, सदर खून करण्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे पिस्टल जवळ बाळगलेले आहेत. सदर इसमाचा कोंढवा तपासपथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, अंमलदार पोलीस हवालदार योगेश कुंभार, पोलास नाईक सुशील धिवार, पृथ्वीराज पांडुळे, निजाम मोगल, पोलीस शिपाई गणेश चिंचकर, महेश राठोड, मोहन मिसाळ, अभिजित रत्नपारखी शोध घेत होते.
शोधपथकातील पोलिसांना सदर आरोपी लुल्लानगर पुलाखाली त्याच्या साथीदारासह त्याच्या रूममध्ये मिळून आला. त्या वेळी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तीन देशी बनावटीचे पिस्टल, सहा मॅगझीन, सात जिवंत राऊन्ड व रोख रक्कम एक लाख 20 हजार रुपये मिळून आले. त्याबाबत त्यांच्याकडे तपास केला असता ते उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागले. त्या वेळी त्यांना पोलीस ठाण्यास आणून मिळालेल्या अग्निशस्त्राबाबत कौशल्याने तपास केला असता, त्याने सांगितले की, कॅम्पमधील एकावर एकाने 4-5 वर्षीपूर्वी कॅम्प भागात फायरिंग केली होती. त्याचा त्याला बदला घ्यायचा होता. यातील आरोपीला एकाचा खून केल्याच्या बदल्यात सुपारी देणार्‍याकडून भरपूर पैसे देणार होते, तसेच पोलीस स्टेशन, कोर्ट, जेल सर्व बघणार होते. शिक्षा भोगत असलेल्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळवून देऊ, असे त्यांना सांगितले होते.
आरोपी हा खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असून, सध्या कोविड रजेवर बाहेर आला आहे. त्याच्याकडे कोर्टकामकाजासाठी पैसे नसल्याने त्याने एकाला मारण्याची सुपारी घेतली होता. तिघांनी मिळून एकाला मारण्याचा प्लॅन तयार केला. सदर खुनाच्या प्लॅनमध्ये आरोपीने त्याचा येरवडा जेल शिक्षेत असताना झालेल्या मित्राला सोबत घेतले होते. सदर दोन्ही आरोपी हे सुपारी घेऊन खुनाच्या तयारीमध्ये असताना कोंढवा पोलिसांनी त्यांना पकडले. सदर इसमाविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे खुनाचा डाव पोलिसांनी कारवाई करून उधळून लावला. त्याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस स्टेशनचे कौतुक केले आहे.
सदर गुन्हयाचा तपास हा, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे शब्बीर सय्यद यांच्या निगराणीखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे हे करीत आहेत.

get_footer();