आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोल्हापुरातील मानसिक रुग्ण पोलिसांमुळे कुटुंबीयांच्या ताब्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 25, 2021

डेक्कन पोलिसांची सतर्कतेची कामगिरी : कुटुंबीयांनी मानले आभार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

डेक्कन पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोल्हापूरहून चुकून पुण्यात आलेला मानसिक रुग्ण सुखरूपपणे आपल्या कुटुंबीयांपर्यंत पोहचला. त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.


डेक्कन पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास प्रभात बिट मार्शल अंमलदार पोलीस शिपाई पठाण, कांबळे यांना बी.एम.सी.सी. कॉलेज रोडवर एक इसम दुचाकी स्प्लेंडर गाडीवरुन संशयीतरीत्या फिरत असताना मिळून आल्याने त्यास प्रभात पोलीस चौकी अंमलदार पोलीस हवालदार चव्हाण यांच्या समक्ष हजर केले.

सदर इसमास विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव अनिकेत नितीन खापरे (वय २८, रा. शाहुमिल चौक, कोल्हापूर) असे सांगून, घरात भांडणे झाल्याने कोल्हापूरवरून माझ्या दुचाकीवरुन पुण्याला आलो आहे. माझा मोबाईल फोन प्रवासामध्ये कोठेतरी पडून गहाळ झाला असून, मला माझ्या घरातील कोणाचाही नंबर आठवत नाही, असे सांगितले.


सदरचा इसम हा मानसिक रुग्ण असल्याचे लक्षात आल्याने पोलीस हवालदार चव्हाण यांनी वरील पत्ता कोणत्या पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात येतो याची खात्री करुन राजारामपुरी पोलीस ठाणे, कोल्हापूर येथे मोबाईलवर संपर्क करून, महिला अंमलदार जाधव यांच्यासोबत चर्चा करून सदर प्रकराबाबत माहिती सांगून सदर पत्त्यावर खात्री करण्याबाबत सांगितले असता, वरील पत्त्यावर त्याचे कुटुंबीय मिळून आल्याने त्यांच्या सोबत संपर्क केला असता त्यांनी अनिकेत यास मानसिक आजार असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तो यापूर्वीदेखील घरातून निघून गेला होता, असे सांगून त्यास पोलीस ठाणे येथे थांबवून ठेवा, आम्ही सकाळी साडेआठ वाजेपर्यंत घेण्यास येत आहोत सांगितले.


तद्नंतर सकाळी नऊच्या सुमारास सदर इसमाचे वडील व काका हे डेक्कन पोलीस ठाणे, पुणे शहर येथे हजर झाल्याने सदर इसम अनिकेत नितीन खापरे यास त्यांच्या ताब्यात देण्यात आले. सदर इसमाचे वडील आणि काका यांनी आनंदित होऊन पुणे शहर पोलिसांमुळे आमचा मुलगा सुखरूप मिळाला आहे, असे सांगून डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस शिपाई पठाण आणि कांबळे यांचे आभार मानले.

get_footer();