आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोंढव्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा राहत्या घरात आढळला मृतदेह

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 13, 2021

दोघांना घेतले ताब्यात : हत्या की आत्महत्या, परिसरात एकच खळबळ

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सॉफ्टवेअर अभियंत्याचा मृतदेह पुण्यातील राहत्या घरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला आहे.

गणेश यशवंत तारळेकर (वय-४७) असे मृत सॉफ्टवेअर अभियंत्याचे नाव आहे. त्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याचे त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी सांगितले. मात्र, पुणे पोलिसांना यामध्ये काही तरी काळेबेरे वाटत असल्याने पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरु केला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, मयत गणेश हे विवाहित असून त्यांना 14 वर्षाचा मुलगा आहे. त्याची पत्नी सध्या माहेरी राहते. तीन दिवसांपूर्वी ते राहत्या घरी काही मित्रांसोबत एकत्र बसले होते. पार्टी सुरु असताना त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतल्याचे त्यांच्यासोबत असलेले मित्र सांगतात. हा प्रकार घडल्यानंतर मात्र त्याच्यासोबत असलेले दोन्ही मित्र घटनास्थळावरुन पसार झाले होते.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गणेश तारळेकर यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ससून रुग्णालयात पाठवून दिला. गणेश यांचा खून झाला की त्यांनी आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();