आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोट्यवधीला गंडा घालणारे दाम्पत्य दिल्ली विमानतळावर केले जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 3, 2021

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक-२ची कारवाई : न्यायालयाने ट्रान्झिट रिमांडमध्ये पाठविले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : गुंतवणुकीवर २४ टक्के वार्षिक परतावा देण्याच्या आमिषाने कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या सोमजी दाम्पत्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२च्या दिल्ली विमानतळावर ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपी कॅनडामध्ये पळून जाण्याच्या तयारीत होते. आरोपींना न्यायालयाने ट्रान्झिट रिमांडमध्ये पाठविले आहे.

अनलेश अकिल सोमजी (वय ३७, रा. अमर वेस्टव्हिड, लेन नं.५, कोरेगाव पार्क, पुणे) आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी पुण्यातील अनेकांना एम.जे. एंटरप्रायजेस कंपनीद्वारे १८ ते २४ टक्के परतावा देण्याच्या आमिषाने गंडा घातला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. या दाम्पत्याविरोधात २९ ऑक्टोबररोजी लुकआऊट नोटीस जारी केली होती. या दोघांना दिल्ली विमानतळावर इमिग्रेशनने ताब्यात घेतले. आरोपींना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतल्यानंतर पुणे पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या खडणी विरोधी पथक-२ने दिल्ली येथे रवाना झाले. पथकाने कायदेशीर कारवाई करून दाम्पत्याला ताब्यात घेऊन अटक केली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, अंमलदार सैदोबा भोजराव, अमोल पिलाणे, आशा कोळेकर, विजय गुरव, संग्राम शिनगारे, सुरेंद्र जगदाळे, शैलेस सूर्वे, राहुल उत्तरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे म्हणाले की, सोमजी दाम्पत्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल असून, तीन कोटी ३७ लाखांची फसवणूक केली आहे. त्यांच्याविरुद्ध २७ ऑक्टोबरला गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी फिर्यादीला २०१८ पासून परतावा देणे बंद केले होते. त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यास आणखी गुंतवणूकदार पुढे येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

get_footer();