आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जमीन देण्याच्या बहाण्याने रिअल इस्टेट व्यावसायिकाला सव्वातीन कोटींचा गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 3, 2021

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

जमीन विक्री करायची असल्याचे सांगून दोघांनी रिअल इस्टेट व्यावसायिकाची तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील लोहगांव येथे फेब्रुवारी 2014 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत घडला आहे.

धनराज ज्ञानेश्वर मोझे (वय-58 रा. मोझे आळी, लोहगांव), भरत बाळासाहेब पवार (वय-35 रा. डी.वाय. पाटील कॉलेज रोड, लोहगांव) यांच्या विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनिष ज्ञानेश्वर म्हस्के (वय-48 रा. ज्ञानाई बंगला, कळसमाळवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनिष म्हस्के यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे.
आरोपींनी संगनमत करुन फेब्रुवारी 2014 मध्ये म्हस्के यांच्याशी संपर्क साधला. त्यांना सुभाष गोयल यांच्या मालकीची लोहगाव येथील 16.5 एकर जमीन प्लॉटींग करीता विक्री करायची असल्याचे सांगितले. गोयल यांची जमीन तुम्हाला मिळवून देतो असे सांगून आरोपींनी म्हस्के आणि गोयल यांची ओळख करुन देत व्यवहार ठरवला. या व्यवहाराचा गैरफायदा घेत आरोपी धनराज मोझे याने म्हस्के यांच्याकडून जमिनीच्या मोबदल्यात 2 कोटी 75 लाख रुपये घेतले.

तर आरोपी भरत पवार याने देखील 45 लाख रुपये म्हस्के यांच्याकडून वेळोवेळी घेतले. म्हस्के यांनी जमीनीबाबत मोझे आणि पवार यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी जमीनीचा व्यवहार पूर्ण करुन देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे म्हस्के यांनी आरोपींना दिलेले 3 कोटी 20 लाख रुपयांची मागणी केली. आरोपींनी म्हस्के यांना पैसे मिळणार नाहीत असे सांगून पुन्हा पैसे मागायचे नाहीत असे सांगितले. तसेच पुन्हा पैशांची मागणी केली तर जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. आरोपींनी फसवणूक केल्याचा तक्रार अर्ज म्हस्के यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात दिला. पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.

get_footer();