आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लायन्स क्लब बार्शी टाऊन आणि लिओ क्लब बार्शीकडून चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदत

maharashtrajainwarta • Previous Issue • August 6, 2021

140 पोती ज्वारी, 1200 साड्या, 400 ड्रेस किट आणि पशुखाद्यासह संसारोपयोगी साहित्याचा समावेश

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

लायन्स क्लब बार्शी टाऊन व लिओ क्लब बार्शी यांच्याकडून संयुक्तपणे चिपळूण येथील पूरग्रस्तांना 140 पोती ज्वारी, 1200 साड्या, 400 ड्रेस किट आणि पशुखाद्यासह संसारोपयोगी साहित्याची मदत करण्यात आली.

कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत अतिवृष्टीने आपद्ग्रस्त झालेल्या नागरिकांना रत्नागिरीचे उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर तसेच चिपळूण लायन्स क्लब यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत लायन्स क्लब बार्शी टाऊन व लिओ क्लब बार्शी यांनी संयुक्तपणे चिपळूण येथील पूरग्रस्तांना धान्य व संसारोपयोगी साहित्याच्या माध्यमातून मदत करण्यात आली.
दरम्यान, लिओ क्लब बार्शीच्या वतीने शहरातील किराणा व्यापारी तसेच सकल जैन समाज यांना आपदग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन केल्यानंतर बार्शी किराणा व्यापार्‍यांनी 25 किलोची 140 पोती ज्वारी तसेच सकल जैन समाज बार्शी यांनी 1200 साड्या व 400 ड्रेसचे किट व पशुखाद्य संघटनेच्या वतीने जनावरांसाठी 12 पोती पशुखाद्य अशी मदत लिओ क्लब ऑफ बार्शी टाऊनकडे सपूर्त केली.
लायन्स क्लब बार्शी टाऊन आणि तेजस्विनी क्लब बार्शीच्या सर्व सदस्यांनी आपदग्रस्तांना मदत करण्यासाठी संयुक्तपणे रोख रक्कम जमा करत त्यातून बादली, मग, पुसणी, फिनेल, काडीपेटी, सॅनिटरी पॅड प्रत्येकी 100 नग, व ताट 200 व वाटी 400 असे जीवनावश्यक वस्तूंचे 100 किट तयार केले. हे सर्व किट वाहनाद्वारे चिपळूण येथे गुरुवारी (ता. 5) पाठविण्यात आल्याची माहिती लायन्स क्लब बार्शीचे अध्यक्ष अजित देशमुख यांनी दिली.
हा उपक्रम यशस्वितेसाठी लायन्स क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष अजित देशमुख, सचिव रवी राऊत, खजिनदार प्रीतम सुरवसे, लिओ क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ, सचिव आदित्य सोनिग्रा, उपाध्यक्ष यश मेहता, तेजस्विनी क्लबच्या अध्यक्ष शर्वरी फुरडे, सचिव पल्लवी बजाज, सकल जैन समाज बार्शीचे पारस कांकरिया, धन्यकुमार शाह आणि बार्शी किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शैलैश शेलार, निनाद होनराव, हरिभाऊ कोष्टी, आप्पा गुडे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक लिओ क्लबचे अध्यक्ष पवन श्रीमीमाळ यांनी केले, तर आभार प्रीतम सुरवसे यांनी मानले.

रत्नागिरीच्या उपजिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत लायन्स क्लब व लिओ क्लबने आपदग्रस्तांना मोठी मदत केली आहे. भविष्यातही असेच समाजोपयोगी कार्यक्रम राबवावेत, यासाठी सकल जैन समाज बार्शीच्या वतीने नेहमी मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

  • पारस कांकरिया,
    अध्यक्ष, सकल जैन समाज, बार्शी
get_footer();