आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया समाविष्ट करणार

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • August 21, 2021

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आश्वासन : एच. व्ही. देसाई नेत्ररुग्णालयास भेट

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे : महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. एच. व्ही. देसाई नेत्ररुग्णालयास भेट देऊन रुग्णालयाच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी हे आश्वासन दिले.

पुणे अंधजन मंडळाचे एच. व्ही. देसाई नेत्ररुग्णालय मागील २० वर्षांपासून ग्रामीण भागातील रुग्णांकरिता नेत्रसेवा प्रदान करीत आहे. पुणे व त्यालगतच्या ५-६ जिल्ह्यांतील सहा लाखांपेक्षा जास्त रुग्णांच्या नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
मागील दोन वर्षांपासून मंत्री महोदयांच्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी विभागातील जवळपास ३५०० रुग्णाची मोफत नेत्रशस्त्रक्रिया रुग्णालयातर्फे करण्यात आल्या आहेत. या कार्याचा गौरव व कामाची प्रशंसा करण्याकरिता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिनांक १९ ऑगस्ट २०२१ रोजी भेट घेतली. या कार्यक्रमासाठी रुग्णालयाचे चेअरमन नितिन देसाई, संस्थेचे अध्यक्ष राजेश शहा, उपाध्यक्ष सुधीर साबळे व मनीष जैन, सचिव राहुल राठी, खजिनदार मयूर व्होरा, विश्वस्त धनंजय पाटील, संस्थेचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक कर्नल डॉ. मदन देशपांडे, कार्यकारी संचालक परवेझ बिलिमोरिया, सीईओ जी. व्ही. राव, मेडिकल डायरेक्टर डॉ. राहुल देशपांडे, डॉ. सुचिता कुलकर्णी आणि डॉ. कुलदीप डोळे, इतर पदाधिकारी आणि रुग्णालयातील स्टाफ उपस्थित होता.
मंत्री राजेश टोपे यांनी या वेळी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली, त्यानंतर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली. या कार्यक्रमादरम्यान रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या लहान मुलांच्या विभागातील चष्माघराचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या बरोबरच पुणे अंधजन मंडळाचे माजी अध्यक्ष दिवंगत निरंजन पंड्या यांच्या जीवनावर आधारित ‘प्रकाशमार्गी’ या आत्मचरित्राचे अनावरण करण्यात आले. डॉ. सुचेता कुलकर्णी यांनी हॉस्पिटलच्या आजवरच्या कामाचा आढावा घेतला, तर अंधत्व निर्मूलनाकरिता भविष्यामध्ये काय उपाययोजना करता येतील, हे डॉ. कुलदीप डोळे यांनी सांगितले.
या वेळी बोलताना राजेश टोपे यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले. जालना जिल्ह्यातील ३५०० रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्याचे काम शब्दांत वर्णन करता येणार नाही, असे ते म्हणाले. शासनाचा आरोग्य विभाग आपल्या मार्गदर्शनासाठी काम करील आणि संस्थेला नवीन व्हिजन सेंटर उभारण्याकरिता व इतर कामांमध्ये सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासन दिले.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अंधत्व निर्मूलनाकरिता काम करण्याच्या सर्व विभागांतील लोकांच्या प्रशिक्षणवर भर द्यावा, त्याकरिता आरोग्य मंत्रालय आपणास पूर्णपणे मदत करील, असे त्यांनी नमूद केले.

राज्यातील ऑर्गन डोनेशन कायद्यात बदल करून नेत्रदानातील येणारी अडचणी दूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सर्व महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ काउन्सिलिंग सेंटर उभे करण्याबरोबरच मराठवाड्यामध्ये जालना येथे एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे एक सेंटर उभे राहावे, अशी इच्छा व्यक्त केली.

६ ते १८ वयोगटातील मुलांना शासन मोफत चष्मा वाटप करीत आहे. या कार्यक्रमासाठी एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलने मार्गदर्शन करावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. डोळ्यांसाठी दिली जाणारी ए टु झेड (सर्वसमावेशक) नेत्रसुविधा देणारे एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव हॉस्पिटल आहे.

नेत्रविकाराबद्दल जनजागृती निर्माण करण्याकरिता आवश्यक अशा जाहिराती तयार करण्याकरिता एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलने मदत करावी, अशी अपेक्षा बोलून दाखविली. कार्यक्रमाच्या शेवटी परवेझ बिलिमोरिया यांनी सर्वांचे आभार मानले.

get_footer();