आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सोमवारचा बार्शी बंदचा निर्णय मागे

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue, Social • September 19, 2021

समस्यांवर तोडगा काढण्यावर सहमती झाल्याने बार्शी व्यापारी महासंघाचा निर्णय

बार्शी : महाराष्ट्र 360 न्यूज

बार्शी शहराच्या विविध भागांतील वाहतूक कोंडीवर तोडगा काढताना त्या त्या भागात व्यापाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समस्यांवर तोडगा काढण्यावर सहमती झाल्याने बार्शी व्यापारी महासंघाने सोमवार दि. २० रोजी पुकारलेला ¨बार्शी बंद° मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे सोमवारी नेहमीप्रमाणे बार्शीतील बाजारपेठ सुरू राहणार आहे.पोलिसांनी बार्शीत विविध भागांत वाहतूक सुरळीत होण्याच्या अनुषंगाने कारवाई सुरू केली होती.

त्यावर व्यापाऱ्यांनी पोलिसांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याच्या निषेधार्थ बंद पुकारला होता. तसे निवेदन त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याकरिता येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत शनिवारी सायंकाळी बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी बैठकीत व्यापाऱ्यांनी मालाचा चढउतार करताना रस्त्यावर वाहन उभे केल्यानंतर त्यांना दंड केला जाऊ लागल्यामुळे वाहनचालक बार्शीला येण्यास घाबरत आहेत. याचा बार्शी बाजारपेठेवर दुष्परिणाम होईल. व्यापाऱ्यांना पोलिसांकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याने ते अपमानित होतात. शिस्त लागावी अशीच व्यापाऱ्यांचीही इच्छा आहे. परंतु रहदारीच्या समस्येची सोडवणूक करताना त्यांनाही विश्वासात घेतले जावे. त्यांच्या अडचणी जाणून घेऊन मार्ग काढावा, अशा भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. यावेळी सम-विषम पार्किंग, एकेरी वाहतूक यांची प्रभावी अंमलबजावणीतूनही वाहतूक समस्येवर तोडगा काढता येईल, अशा सूचना उपस्थितांनी केल्या.
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, वाढलेली लोकसंख्या व वाहनांची संख्या तसेच आसपासच्या तालुक्यातून बार्शी बाजारपेठेत विविध कारणाने येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे साहजिकच येथील रहदारीवर ताण येत आहे. या समस्येवर मार्ग काढताना कायदा व माणुसकी असा समन्वय साधून कार्यवाही व्हावी. त्या त्या भागात जाऊन व्यापाऱ्यांची बैठक घेऊन कशा पद्धतीने वाहतूक समस्येवर मार्ग काढता येईल हे पाहा. शिस्त लावत असताना बाजारपेठेतील व्यापार कमी होऊ नये याचीही दक्षता घेण्याची आपली जबाबदारी आहे, असे सांगत सर्वसहमतीने तोडगा काढून अंमलबजावणी करावी अशा सूचना केल्या.
नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी व्यापारी हे टॅक्सपेअर आहेत, त्यांच्याशी पोलिसांनी गुन्हेगाराप्रमाणे वागू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. पोलीस उपअधिक्षक अभिजित धाराशिवकर यांनी १५ दिवसांत यावर विविध भागांत जाऊन तेथील परिस्थिती जाणून घेऊन समजूतदारपणे यातून मार्ग काढू, त्याला नंतर विरोध करू नये, असे आवाहन केले.
पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी पोलीस अरेरावीने वागत असल्याचा मुद्दा अमान्य करत बार्शीच्या रहदारीला शिस्त लावण्याचाच आपला प्रयत्न आहे. सर्वांनी याला सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नगरपालिकेच्या सीओ यांच्यांशी तसेच व्यापाऱ्यांशी समन्वय ठेवून एका एका भागातील वाहतूक समस्यांचे निराकरण करून सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, या दृष्टिकोनातून पावले उचलणार असल्याचे सांगितले.
यावेळी बार्शी मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कथले,किराणा व्यापारी संघ अध्यक्ष महेश बाफणा , जहीरोद्दीन अतार, सुभाष बदामिया, अनिल गायकवाड, जीवनदत्त आरगडे, महावीर कदम ,राजेंद्र गायकवाड , दिनानाथकाटकर, जीवन आरगडे, धन्यकुमार पटवा, निखील मस्के, पत्रकार योगेश लोखंडे यांनी वाहतुकीच्या कोंडी बाबत मते मांडली. बैठकीसाठी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, पत्रकार व नागरीक उपस्थित होते.

पंधरा दिवसांत जे प्रमुख रस्ते आहेत, त्या रस्त्याच्या व्यापाऱ्यांशी पोलीस प्रशासनाने चर्चा करून आपण व्यापाऱ्यांनीही त्यांना सहकार्य केले पाहिजे, हा मुद्दा लक्षात घेऊन त्यांच्याकडून कितपत सहकार्य होतेय, हे लक्षात घेऊन १५ दिवसांत सर्व काम काजकाज सुरळीत होईल, अशी आशा व्यक्त करून सोमवारचा बंद मागे घेत आहोत.

  • सुभाष लोढा, अध्यक्ष, व्यापारी महासंघ

get_footer();