आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ऑईल चोरीप्रकरणी पाच जणांची टोळी जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 11, 2021

सहकारनगर व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई : बेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत टँकरमधून ऑईल चोरी करून त्यामध्ये काळ्या रंगाची भेसळ करणाऱ्या पाच जणांच्या टोळीस गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले असून, एकूण बेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहकारनगर पोलीस स्टेशन आणि भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन यांनी ही कारवाई संयुक्तपणे केली आहे.

बुधवारी (०८ सप्टेंबर) पोलीस उपआयुक्त सागर पाटील यांना बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, कात्रज जुना घाटामध्ये भिलारेवाडी, आर. के. ट्रान्सपोर्ट शेजारील मोकळ्या जागेमधील झाडा-झुडपांच्या पाठीमागे ऑईलचे दोन टँकर उभे असून त्यामधून काही इसम हे ऑईल चोरी करीत आहेत. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सहकारनगर पोलीस स्टेशन व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या सयुक्तिक पथक तयार करून मिळालेल्या बातमीची शहनिशा करण्याकरीता पाठवून दिले. संयुक्त पथक हे मिळालेल्या बातमीची शहनिशा करण्याकरीता नमूद ठिकाणी गेले असता, सदर ठिकाणी चार इसम टँकरमधून ऑईल चोरी करीत असताना दिसून आले. त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागताच ते सदर ठिकाणाहून पळून जात असताना अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

राजू मानसिंग जाधव (वय ३५, रा. जैन मंदिर संतोषनगर कात्रज), श्रीकांत श्रीमंत पाटोळे (वय ३७, रा. खंडाळे चौक, तळजाई वसाहत, सहकारनगर, पुणे), हुसेन रज्जाक शहाआलम (वय ३७, रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) आणि सुशील कुमार रॉय (वय ४२, रा. १० फिट रोड, साकीनाका, मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. सदर चोरीबाबत अधिक माहिती घेतली असता सदरची चोरी ही अमित जगदिश पांडे (रा. लेननं ०७, संतोषनगर, कात्रज पुणे) याच्या सांगण्यावरून केली जात असल्याचे निष्पन्न झाल्याने, त्यासदेखील ताब्यात घेण्यात आले.

पोलीस अंमलदार सागर रघुनाथ शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे फिर्याद दिल्याने ताब्यात घेतलेल्या इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक करून न्यायालयामध्ये हजर ठेवले असता न्यायालयाने त्यांची दिनांक १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. सदर कारवाईमध्ये एकूण चार टँकर, दोन अॅक्टिवा, मोटार सायकल व इतर साहित्य असा एकूण रुपये ४२,०३,१०० इतक्या रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.


सदरची कारवाई ही पोलीस उप आयुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कर्चे, पोलीस अंमलदार शिंदे, जाधव, गाडे (सर्व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर), तसेच पोलीस उपनिरीक्षक घाडगे, पोलीस अंमलदार इंगळे, फरांदे, नाळे, सुतकर, मंडलिक (सर्व सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर) यांनी संयुक्तरीत्या केलेली आहे.

get_footer();