आवृत्ती पुणे
← Back to Homepage

हॉटेल मॅनेजरसह इतर 15 जणांकडून ग्राहकांना मारहाण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 1, 2022

पैसे देण्यावरून झाले भांडण : पुण्याच्या कोथरूडमधील हॉटेल स्पाईस गार्डनमधील प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या वडिलांना व त्यांच्या मित्रांना हॉटेल मॅनेजर व इतर कामगारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हॉटेलमधून हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कोथरुडमध्ये राहणार्‍या एका ३६ वर्षाच्या पालकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हॉटेल स्पाईस गार्डनचे मॅनेजर विनय शेट्टी व हॉटेलमधील कॅप्टन दयानंद, सचिन व इतर हॉटेलमधील १३ ते १५ कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार किष्किंदानगर येथील हॉटेल स्पाईस गार्डनमध्ये २५ डिसेंबर रोजी रात्री पावणेबारा वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेल स्पाईस गार्डन येथे गेले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर व सर्व पाहुणे गेल्यानंतर फिर्यादी त्यांच्या मित्रासोबत जेवण करीत होते. त्यावेळी हॉटेलचा मॅनेजर विनय शेट्टी तेथे आला व त्याने फिर्यादीकडे बघून खूप उशीर झाला, यांचे जेवण कधी होणार, पैसे देणार की नाही, असे फिर्यादी यांना टोमणे मारले. फिर्यादी यांचे जेवण झाल्यावर त्यांनी गुगल-पेद्वारे पैसे ट्रान्सफर केले. परंतु पैसे ट्रान्सफर न झाल्याने विनय शेट्टी व हॉटेलमधील कॅप्टन दयानंद, सचिन व इतर कामगारांनी फिर्यादी यांना फुकटे आहेत, असे म्हणून त्यांना व त्यांच्या दोघा मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हॉटेलमधून बाहेर हाकलून दिले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड अधिक तपास करीत आहेत.

get_footer();