आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रवाशांना लुटणार्‍या रिक्षाचालकासह त्याचे तीन सराईत मदतनीस जेरबंद

maharashtrajainwarta • Previous Issue • July 21, 2021

सहकारनगर पोलिसांची कामगिरी : सोन्याच्या दागिन्यांसह एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत

पुणे : अभिजीत डुंगरवाल
महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

रिक्षामध्ये मित्रांना पॅसेंजर म्हणून बसवून लूटमार करणार्‍या रिक्षाचालकासह चार सराईत आरोपींना सहकारनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली असून, त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दत्तनगर, कात्रज, येथील एक व्यावसायिक 2 जुलै रोजी दुपारी मार्केटयार्ड पुणे येथून आहिल्यादेवी चौक बालाजीनगर पुणे येथे जाण्यासाठी पॅसेंजर म्हणून रिक्षात बसले. प्रवासादरम्यान त्यांना रिक्षाचालक व त्याच्या तीन साथीदारांनी धक्काबुक्की करून त्यांची सोन्याची चैन काढून घेतली. सदरबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.
दाखल गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) युनुस मुलानी यांच्या अधिपत्याखाली तपासपथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे आणि पोलीस अंमलदार करीत असताना सीसीटीव्ही फुटेजवरून व पोलीस अंमलदार संदीप ननवरे व सागर शिंदे यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, दाखल गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा करताना ज्या रिक्षाचा वापर केला आहे, ते सदर रिक्षामध्ये शिवनेरीनगर, कोंढवा येथे बसलेले आहेत. सदरबाबत वरिष्ठांना कळवून तत्काळ स्टाफसह खाजगी वाहनाने बातमीतील ठिकाणाजवळ येऊन पाहिले असता, बातमीतील वर्णनाचे चार इसम नमूद क्रमांकाच्या रिक्षामध्ये बसलेले दिसले. त्याप्रमाणे खात्री होताच त्यांना सापळा लावून ताब्यात घेण्यात आले.
दाखल गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, त्यांनी चौघांनी मिळून त्यांच्याकडील सदर रिक्षाचा वापर करून दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली. नमूद आरोपींना सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणून दाखल गुन्ह्यात अटक केली आहे.
दाखल गुन्हयात निष्पन्न झालेले सदर चौघे आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. नमूद आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यासह एकूण 1,01,000 रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी ही, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युनुस मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे, पोलीस हवालदार बापू खुटवड, पोलीस नाईक प्रकाश मरगजे. संदीप ननवरे, सतीश चव्हाण, भुजंग इंगळे, पोलीस शिपाई सागर शिंदे, महेश मंडलिक, प्रदीप बेडीस्कर यांनी केली आहे.

get_footer();