रिक्षात सापडलेली रोख रक्कम प्रामाणिकपणे केली परत
बार्शी पोलिसांनी केले रिक्शा चालकाचे कौतुक : सत्तर हजार रुपये होती रक्कम
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी : आजकाल प्रामाणिकपणाची भावना नष्ट होत चालली आहे अशी खंत अनेकदा बोलून दाखवली जाते. या भावनेला छेद देणारे प्रसंग घडतात आणि लोकांमध्ये इमानदारी अजूनही शिल्लक आहे याचा प्रत्यय येतो. अशीच एक घटना बार्शी येथे घडली. एका रिक्षा चालकाला सत्तर हजार साठ रुपये रोख रक्कम असलेली कापडी पिशवी त्याच्या रिक्षात सापडली. त्याने ती प्रामाणिकपणे परत करून प्रामाणिकपणा शिल्लक असल्याचा अनुभव दिला.
हिरमेट नाका सुभाष नगर बार्शी ते मार्केटयार्ड बार्शी दरम्यान प्रवास करत असताना प्रवाशी राजेंद्र साहेबराव पाटील (रा. हिरेमठ नाका आगळगांव रोड, सुभाष नगर, बार्शी.) त्यांच्याकडे रोख रक्कम असलेली कापडी पिशवी नजरचुकीने रिक्षात विसरले होते. रिक्षाचालक देवीदास हरीचंद्र जाधव, (वय. ३५ वर्षे, धंदा. रिक्षाचालक, रा.पंकजनगर बार्शी.) याने ती पिशवी बार्शी पोलिसांच्या ताब्यात दिली.
पोलिसांनी रिक्षा चालकाच्या सांगण्यावरून त्या माणसाचा शोध घेत सदरची व्यक्ती हि गाळा नं १७७ मार्केटयार्ड बार्शी येथील व्यापारी राजेंद्र साहेबराव पाटील हे असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ते परत करण्यात आले.
पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक खराडे, पोलीस कॉन्स्टेबल पृथ्वीराज पवार, उमेश आणेराव (तालुका विभाग प्रमुख पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी), राहुल वाणी (तालुका अध्यक्ष पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी), रणजित कोठावळे (शहर सदस्य पोलीस जाणीव सेवा संघ बार्शी) विजय माळी यांनी कौतुकास्पद कामगीरी केली.
