आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत मोबाईलचोराकडून लाखांचा मुद्देमाल जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 18, 2021

गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी : महागडे १५ मोबाईल संच ताब्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सराईत मोबाईलचोराकडून अडीच लाखांचे महागडे १५ मोबाईल संच ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा युनिट पाचला यश मिळाले असून, एकूण सहा पोलीस स्टेशनमध्ये मोबाईल संच चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

गुरुवारी १४ ऑक्टोबर रोजी युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील स्टाफ हडपसर पोलीस स्टेशनचे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग फिरत असताना पोलीस अंमलदार अजय गायकवाड व आश्रुबा मोराळे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सराईत मोबाईल चोर शंकर गायकवाड याने बसमध्ये प्रवाशाचे मोबाईल फोन चोरलेले असून ते फोन विक्रीसाठी रविदर्शन चौक, हडपसर पुणे येथे येणार आहे.

वरिष्ठांचे आदेशान्वये युनिट ०५ गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी रविदर्शन चौक येथे सापळा रचला असता त्यावेळी तेथील संशयितास ताब्यात घेतले. शंकर हनुमंत गायकवाड (वय ३५, रा. दर्ग्याचे पाठीमागे, सर्वोदय कॉलनी, मुंढवा पुणे) असे त्याचे नाव असून त्याच्या ताब्यातील ॲक्टिव्हा मोपेडची डिक्की तपासली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे एकूण १५ मोबाईल हॅन्डसेट मिळून आले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता आरोपी हा वेगवेगळ्या सी.टी. बसमध्ये प्रवास करून गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्समधून व पुरुषांचे खिशामधून चलाखीने मोबाईल चोरी करीत होता. सदरचे मोबाईल हे चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून एकूण २,३९,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण सहा मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत आणि उर्वरित मोबाईल मालकांचा शोध घेऊन पुढील कारवाई सुरू आहे. सदर आरोपीकडून रेडमी कंपनीचे सहा, सॅमसंगचे तीन, ओपोचे दोन, आयफोन एक, वनप्लस एक आणि टेकनो एक असे एकूण १५ मोबाईल संच जप्त केले आहेत. याबाबत हडपसर, स्वारगेट, येरवडा, लोणीकाळभोर आणि कोंढवा या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, प्रमोद टिळेकर, दया शेगर, आश्रुबा मोराळे, अजय गायकवाड, महेश वाघमारे, चेतन चव्हाण, दीपक लांडगे, प्रवीण काळभोर, विशाल भिलारे, विनोद शिवले, अकबर शेख, दाऊद सय्यद, पृथ्वीराज पांडुळे, विलास खंदारे, अमर उगले, स्वाती गावडे, स्नेहल जाधव, संजयकुमार दळवी यांनी केलेली आहे.

get_footer();