आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मार्केट यार्डच्या नव्या प्रशस्त जागेत स्थलांतरासाठी आग्रही : शरद पवार यांची ग्वाही

maharashtra jain warta • News Slider, Other, Previous Issue, Social • June 29, 2023

‘वाणिज्य विश्व’च्या सुवर्णमहोत्सवी विशेषांकाचे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन, बीएमसीसीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : शहरातील मार्केट यार्डची जागा अपुरी पडत आहे, व्यापार वाढीसाठी नव्या जागी स्थलांतर आवश्यक आहे. त्यासाठी मी राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहे, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी दिली. शहराबाहेर काही जागा पाहिल्या आहेत, त्यावर लवकर निर्णय व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी जाहीर केले.

दि पूना मर्चंट चेंबरचे मुखपत्र असलेल्या ‘वाणिज्य विश्व’ मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन श्री. पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात बीएमसीसीच्या दहा विद्यार्थ्यांना आणि दोन प्राध्यापकांना चेंबरच्या वतीने, श्री. पवार यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठलशेठ मणियार, झी २४ तास या न्यूज चॅनलचे संपादक डॉ. निलेश खरे, उद्योजक फत्तेचंद रांका, चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव रायकुमार नहार, उपाध्यक्ष अजित बोरा, सहसचिव ईश्वर नहार, ‘वाणिज्य विश्व’चे संपादक प्रवीण चोरबेले, सहसंपादक आशीष दुगड, बीएमसीसीचे प्राचार्य जगदीश लांजेकर यांची उपस्थिती होती.
श्री. पवार म्हणाले, ‘धान्य व्यापाऱ्यांचे व्यवहार पूर्वी नाना पेठेत चालायचे. त्यावेळी माझ्याकडे राज्याची जबाबदारी होती. तेथील मार्केटची जागा छोटी होती. म्हणून मी त्याचे सध्याच्या जागेत स्थलांतर करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावेळी त्याला खूप विरोध झाला. मात्र संबंधित व्यापाऱ्यांना राजी करण्यात आम्ही यशस्वी झालो आणि मार्केट यार्डचे स्थलांतर झाले. त्यामुळे व्यापार कैक पटींनी वाढला. नाना पेठेतील वाहतुकीची समस्याही सुटली.’‘वाणिज्य विश्व’बाबत श्री. पवार म्हणाले की, आम्ही त्यावेळी बीएमसीसीचे विद्यार्थी होते. विठ्ठल मणियार यांच्यासह आम्हा तीन-चार जणांचा ग्रुप सर्वच क्षेत्रात सक्रिय होता. त्यामुळे आम्हाला ‘वाणिज्य विश्व’बाबत माहिती मिळत असे. या मासिकाचा व्यापारी वर्गाला खूप लाभ झाला आहे. तसेच मासिकाच्या तत्कालीन संपादकांनी वेळोवेळी सडेतोड भूमिका घेऊन राज्य सरकारला चुका दाखवून दिल्या आहेत. त्याचा सुवर्णमहोत्सव साजरा होतोय ही आनंदाची बाब आहे.
‘व्यापाराचे विद्यापीठ’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात मी शिष्यवृत्तीची कल्पना मांडली होती. आपण ज्या संस्थेत शिकलो, तिच्या विद्यार्थ्यांना मदत करणे ही त्यामागे भावना होती. दि पूना मर्चंट चेंबरने त्याची त्वरित अंमलबजावणी केली त्याबद्दल मी चेंबरचे अभिनंदन करतो, असे उद्‌गार श्री. पवार यांनी काढले.
सचिव रायकुमार नहार यांनी प्रास्ताविक करताना, चेंबर आणि ‘वाणिज्य विश्व’च्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरवपूर्ण उल्लेख करत सर्वांचे आभार मानले.

get_footer();