आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अनधिकृत फ्लॅटची विक्री करून फसवणूक करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 29, 2021

कोंढवा पोलिसांची कारवाई : ऑक्टोबर २०१५ ते १७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अनधिकृतपणे बांधलेल्या फ्लॅटची विक्री करुन 47 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. फसवणुकीचा प्रकार ऑक्टोबर २०१६ ते १७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला.

मजहर नजीर शेख (वय-४८ रा. हिल टॉप सोसायटी, पारगेनगर, कोंढवा खु.) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी फिरोज मोहंमदइसा शेख (वय-४५ रा. ताबूत स्ट्रीट कॅम्प, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांना फ्लॅट खरेदी करायचा असल्याचे आरोपी मजहरला सांगितले. त्यावेळी त्याने कोंढवा बुद्रुक येथे एम. एस. कन्स्ट्रक्शन या बांधकाम व्यावसायाच्या नावाने हिल टॉप सोसायटीची इमारत बांधली असल्याचे सांगितले. तसेच फिर्यादी यांना तळमजल्यावरील फ्लॅट घेण्यास भाग पाडले.

फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये अ‍ॅग्रिमेंट टु सेल करारनामा झाला. त्यानंतर फिर्यादी यांनी फ्लॅटची ठरलेली 47 लाख रुपयांची रक्कम आरोपी मजहर यांना दिली. सर्व रक्कम दिल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना रक्कम मिळाल्याबाबतचा करारनामा करुन दिला. पैसै देऊनही आरोपीने फिर्यादी यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. काही दिवसांनी खरेदी केलेला फ्लॅट हा अनधिकृतपणे बांधला असल्याची माहिती फिर्यादी यांना मिळाली. फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली असता आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच माझ्याकडे पैसे आल्यानंतर देईन असे म्हणत पैसे मागितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिरोज शेख यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात मजहर शेख याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

पोलिसांनी फिरोज यांच्या फिर्यादीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन खेतमाळस करीत आहेत.

get_footer();