आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वारजे येथे जागेच्या वादातून ‘राडा’ करणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 16, 2022

वारजे पोलिसांत फिर्याद : कोयत्याने वार करुन वाहनांची केली तोडफोड

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भाड्याने जागा दिली असता ती बळकावून टोळक्याच्या मदतीने मावस भावाने तरुणाच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर टोळक्याने घराबाहेर लावलेल्या २ मोटारसायकली, रिक्षा व कारची तोडफोड करुन दहशत माजविल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी सागर दगडु बराटे (वय ३८, रा. वारजे गाव) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गोपी ऊर्फ विजय परबती साष्टे (वय ३९, रा. दत्तनगर, वारजे), यश विजय साष्टे, कार्तिक कांबळे (रा. रामनगर), आकाश ऊर्फ तितल्या मुलजे, प्रतिक ऊर्फ राणा क्षीरसागर, अमित, विशाल व इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय साष्टे याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, सागर बराटे हे कन्ट्रक्टर असून त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांनी राहत असलेल्या शेजारी त्यांचा मावस भाऊ विजय साष्टे याला १०/१० चे दुकान प्रति १ हजार रुपये भाड्याने १० वर्षापूर्वी दिले होते. त्याने ते बळकाविले. त्याबद्दल त्यांचा न्यायालयात वाद चालू आहे. गोपी साष्टे यांची आई व फिर्यादी यांची आई या सख्या बहिणी आहे. त्यांची एक मावशी आशा जाधव या रामनगरमध्ये राहत असून त्या फिर्यादी यांच्या बाजूने आहेत, याचा विजय साष्टे याला राग होता.

गेल्या दोन दिवसांपासून विजय व त्याचा मुलगा यश जागेच्या कारणावरुन वाद घालत. रविवारी रात्री साडेनऊ वाजता विजय, त्यांचा मुलगा यश व त्यांच्या परिसरात दहशत माजविणारे कार्तिक कांबळे व इतर हातात कोयते, दगड घेऊन आले. त्यांनी फिर्यादी यांच्या घरावर दगडफेक केली. हे पाहून फिर्यादी बाहेर आले असताना आकाश याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या गळ्यावर वार केला. परंतु, तो वार फिर्यादीने चुकविला. तेव्हा त्याचा कोयता पत्र्याच्या शेडमधील पत्र्यात अडकून बसला. त्यामुळे फिर्यादी यांचा जीव वाचला. यावेळी विजय, यश, कार्तिक यांनी कोयत्याने आशा जाधव यांची मुले सुरज व किरण यांच्या गाड्या फोडल्या. तसेच इतरांनी पार्क केलेल्या रिक्षा व कार यांच्यावर दगड मारुन त्या फोडल्या. त्यांना रोखण्यासाठी काही रहिवासी व रिक्षाचालक आले असताना त्यांना आकाश याने धमकावले. कोणी पुढे आला तर खांडोळी करुन टाकू, अशी धमकी दिली. त्यामुळे लोक घाबरुन पळून गेले. ही संधी साधून फिर्यादी त्यांचा जीव वाचविण्यासाठी तेथून पळून गेले. वारजे पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन विजय साष्टे याला अटक केली आहे.

get_footer();