आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विमानाने येवून पुण्यात चोरी करणारे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 24, 2021

गुन्हे शाखेच्या युनिट-४ची जबरदस्त कारवाई : ६ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४च्या पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील 6 लाख 37 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरटे उत्तर प्रदेशातून चोरी करण्यासाठी चक्क विमानाने पुणे शहरात येत होते आणि चोरी केल्यानंतर तात्काळ पुन्हा विमानाने उत्तर प्रदेशात जात होते.

परवेज शेर मोहम्मद खान (वय ४३, रा. एस.पी.जी. गल्ली नं.२ जवळ, सुरजपूर, देवला, ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश), तस्लीम आरिफ समशुल खान (वय २३, रा. मु.पो. धुमरी, ता. अलीगंज, जी. ऐटा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

परवेश खान याच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये 9 तर तस्लीम खान याच्यावर दिल्ली येथे 3 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून गुन्ह्यातील 6 लाख 37 हजार रुपये किमतीचे १३० ग्रॅम सोने जप्त केले आहे.
गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी दोन संशयित इसम लोहगाव येथील ५०९ चौकात थांबले असून त्यांनी विश्रांतवाडी आणि धानोरी परिसरात घरफोड्या केल्याची माहिती पोलिस अंमलदार राकेश खुणवे आणि अशोक शेलार यांना सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये त्यांनी वानवडी येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.

चोरी करण्याचा फंडाच निराळा..

आरोपी परवेज खान हा कपडे विक्री करतो. दोघेही सराईत गुन्हेगार असून ते वॉचमन नसलेल्या सोसायटीची रेकी करत होते. ज्या ठिकाणी वॉचमन नाही त्या इमारतीत ते चोरी करत होते. चोरी करण्यासाठी उत्तर प्रदेशातून विमानाने पुण्यात येत होते. चोरी केल्यानंतर लगेच पुन्हा विमानाने उत्तर प्रदेशला निघून जात होते.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, राजस शेख, राकेश खुणवे, संजय आढारी, प्रविण भालचिम, विशाल शिर्के, दत्ता फुलसुंदर, अशोक शेलार, रमेश राठोड यांच्या पथकाने ही जबरदस्त कारवाई केली.

get_footer();