आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वृद्धेकडून बेकायदेशीर वसुली करणाऱ्या सावकाराला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 8, 2022

खडक पोलिसांची कामगिरी : आठ एटीएम कार्ड व पाच पासबुक केले जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बेकायदेशीर सावकारी करून ४० हजार रुपयांच्या व्याजापोटी एक लाख रुपये घेऊनही पेन्शची रक्कम हडप करणाऱ्यास खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून आठ एटीएम कार्ड व पाच पासबुक जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिलीप विजय वाघमारे (वय ५२, रा. गंज पेठ, पुणे) असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे.

पाच वर्षांपूर्वी ७० वर्षीय महिलेने नातीच्या उपचारासाठी ४० हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतले. त्या बदल्यात महिलेने बँकेतून कर्ज घेऊन ४० हजार रुपये मुद्द व व्याजापोटी एक लाख रुपये दिले. त्यानंतरही सावकाराने महिलेच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत आणखी व्याज बाकी असल्याचे सांगून दोन एटीएम कार्ड व पासबुक काढून घेतले. पेन्शची जमा होणारी १६ हजार ३४४ रुपये काढून घेऊन सावकार महिलेला एक दोन हजार रुपये मागिल पाच वर्षांपासून देत होता. आतापर्यंत एकूण आठ लाख रुपये सावकाराने बेकायदेशीरपणे वसूल केले, तरी आणखी देणे लागत असल्याचे सांगून एटीएम कार्ड व पासबुक देण्यास नकार देत होता. त्या महिलेने मिळणारी रक्कम ही अपुरी असणारी तिच्या दवापाण्यास खर्च होत होती. त्यामुळे तिच्यावर उपासमारीची वेळ आल्याने ती सारसबागेतील गणपती मंदिरासमोरील पदपथावर भीक मागून जगत होती.

हा प्रकार दर्शनासाठी आलेल्या व्यक्तीने पाहून तिची चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. त्या व्यक्तीने थेट खडक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना भेटून वृद्ध महिलेची व्यथा सांगितली. त्यांनी लागलीच सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल करून घराची झडती घेतली, त्यावेळी पेन्शनधारकांची आठ एटीएम कार्ड व पाच पासबुक मिळून आले. आरोपी हा महापालिकेमध्ये झाडू खात्यात काम करत असून, बेकायदेशीर १० टक्के दराने व्याजाची वसुली करीत असल्याचे तपासात उघडकीस आले. अशा प्रकारे कोणाला आरोपी त्रास देत असेल किंवा बेकायदेशीरपणे व्याज वसूल करीत असेल, तर खडक पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन बहिरट यांनी नागरिकांना केले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीष गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हर्षवर्धन गाडे, पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी, पोलीस अंमलदार श्रीकांत तुळसुलकर, महेंद्र कोलते, मुसा पठाण, बलटू घाडगे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();