आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाईन शॉप मालकाच्या डोक्यात फोडली दारूची बाटली

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 22, 2021

चौघांवरगुन्हा दाखल : पिंपरी-चिंचवडमध्ये घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वाईन शॉपमध्ये खरेदीसाठी आलेल्या चौघांना रांगेत येण्यास सांगितल्याच्या कारणावरुन दुकानातील मॅनेजरला दमदाटी करत असताना वाईन शॉपचे मालक मध्यस्थी करण्यासाठी गेले असताना त्यांच्या डोक्यात दारुची बाटली फोडली. ही घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली असून या घटनेत वाईन शॉप मालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपींनी मारहाण करुन गल्ल्यातील रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार 15 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वासातच्या सुमारास पिंपरी येथील रिगल वाईन शॉप येथे घडला.


वाईन शॉपचे मालक कीर्ती लक्ष्मण राजपूत (वय-28 रा. सद्गगुरु बिल्डिंग, पिंपरी रेल्वे स्टेशन जवळ, पिंपरी) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 25 ते 30 वयोगटातील चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, कीर्ती राजपूत यांचे अशोक टॉकिजजवळ रिगल वाईन शॉप नावाचे दुकान आहे. मानसिंग हे दुकानात मॅनेजर म्हणून काम करतात. दसऱ्याच्या दिवशी रात्री 7.20 वाजता चारजण वाईन शॉपमध्ये आले होते. त्यावेळी मॅनेजर मानसिंग यांनी चौघांना रांगेत येण्यास सांगितले. यावरुन चौघांनी त्यांच्यासोबत वाद घालून ओल्डमंक आणि व्हिस्कीची मागणी केली.

आरोपींनी 700 रुपये बिलापैकी 500 रुपये रोख तर 300 रुपये फोन पे वरुन ट्रान्सफर केले. त्यांचे 700 रुपये बिल झाल्याने मॅनेजरने 100 रुपये परत दिले. मात्र आरोपींनी व्हिस्कीचा फुल खंबा पाहिजे पैसे नको असे म्हणत त्यांच्यासोबत वाद घातला. दरम्यान, त्यांचे बोलणे ऐकून फिर्यादी हे कॅश काउन्टरच्या बाहेर येऊन चौघांना समजावून सांगत होते. त्यावेळी एकाने पिशवीत ठेवलेली दारुची बाटली त्यांच्या डोक्यात फोडली व तुटलेल्या भागाने फिर्यादी यांना मरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी यांनी उजवा हात समोर केल्याने त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.

तसेच इतर आरोपींनी दुकानाच्या बाहेर लाईन लावण्यासाठी ठेवलेल्या लोखंडी पोलने त्यांना बेदम मारहाण केली. आरोपींनी दुकानातील गल्ल्यातील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला असता मॅनेजर मानसिंग आणि कामगार अर्जुन यांनी त्यांना दुकानाबाहेर काढून गेट बंद केले. तर दुकानात असलेला फिर्यादी यांचा मित्र संजू याने बाहेर येऊन दुकानाला कुलुप लावले. यानंतर आरोपींनी लोखंडी पाईप आणि सिमेंटचे गट्टू दुकानावर मारले. तसेच दुकानासमोर गोंधळ घालून कामगारांनी पार्क केलेल्या दुचाकींची तोडफोड करुन दुचाकीवरुन पळून गेले.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निखील डोळस करीत आहेत.

get_footer();