आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अत्यंत माफक दरात पोटभर भोजन

Spread the love

कोथरूड येथील श्री वर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम

पुणे : सध्याच्या काळात डझनभर वाट्या असलेली आणि वेलकम ड्रिंक, स्टार्टर्स आणि दोन स्वीट्स अशा ऑफर्स असलेली थाळी देणाऱ्या रेस्टॉरंट्सच्या जाहिराती लक्ष वेधून घेत असताना, दुसरीकडे अत्यंत माफक दरात ताजे, साधे, जैन पद्धतीचे घरगुती आणि सात्विक भोजन पोटभर मिळत आहे, असे सांगितले तर आश्चर्य वाटेल की नाही? पण हे अगदी खरे आहे.

कोथरूडमधील मयूर कॉलनीतील जोग शाळेसमोर असलेल्या श्री वर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठान येथील जैन स्थानक भवन येथे गेल्या चार महिन्यांपासून ‘भुकेलेल्यांना पोटभर जेवण’ या तत्त्वावर चालविण्यात येत असलेल्या उपक्रमात अशा भोजनाचा आस्वाद दररोज असंख्य नागरिक घेत आहेत.

सकाळी साडेअकरा ते दीड, तसेच सायंकाळी साडेपाच ते सात अशी या भोजनशाळेची वेळ आहे. या उपक्रमाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांबरोबरच बँक कर्मचारी, शैक्षणिक संस्थांमधील कर्मचारी, तरुण विद्यार्थी, तसेच समाजाच्या सर्व स्तरांमधील नागरिकांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे जैन भोजनशाळेतील ‘चौविहार हाऊस’ येथे सध्या केवळ शंभर रुपये. या नाममात्र दरात दोन भाज्या, चपाती किंवा फुलका, वरण-भात आणि नमकीन असे गरमागरम भोजन देण्यात येत आहे. रविवारी यामध्ये एका गोड पदार्थाची भर पडते.

याचा सर्व खर्च जैन समाज, तसेच अन्य दानशूर नागरिकांच्या दानातून चालतो. भोजनशाळेची जबाबदारी ईश्वर भटेवरा आणि प्रितेश कर्नावट अत्यंत उत्तमरीत्या सांभाळत असतात. प्रतिष्ठानतर्फे महिन्यातून सहा वेळा वारजे मजूर अड्डा आणि किनारा हॉटेलजवळील मजूर अड्डा येथे २५० ते ३०० जणांना विनामूल्य पोटभर नाश्ता सकाळी नऊ वाजता देण्यात येतो.

तसेच महावीर जयंती आणि महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशीही असा नाश्ता दिला जातो. वर्षातील विविध प्रसंगी रक्तदान शिबीर, तसेच वैद्यकीय तपासणी व उपचार शिबिराचेही आयोजन केले जाते. भोजनशाळेच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी आठवड्यातून एक दिवस निःस्वार्थ सेवा देण्याकरिता सर्वत्री चेवरचंद नोरडिया, सतीश भटेवरा, सुनील छल्लाणी, सुनील चोरडिया, नितीश गुगळे, अनिकेत कात्रेला, हेमंत कात्रेला, सतीश राजपुरोहित, कीर्तिराज कात्रेला व हेमत गांधी यांचे सहकार्य लाभते.

त्याचप्रमाणे संस्थेचे अध्यक्ष डॉ. कांतिलाल लोढा, विश्वस्त रसिक भटेवरा, विजय लोढा, डॉ. सुमति- लाल लोढा, अजित नहार, संजय मुनोत परिचार व प्रवीण गांधी यांच्याकडून भोजनशाळा उत्तम प्रकारे चालविण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन प्राप्त होत असते, अशी माहिती भटेवरा यांनी ‘कोथरूड मित्र’शी बोलताना दिली. अत्यंत शांत आणि प्रसन्न वातावरणात भोजन करण्याचा अनुभव ना गरिकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन श्री. भटेवरा यांनी केले आहे.

get_footer();