आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अध्यात्माच्या मार्गावर प्रशंसा हे वीष – प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.

Spread the love

भाविकांच्या उदंड प्रतिसादात रंगला महावीर गाथेचा तिसरा दिवस

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल

पुणे : अध्यात्माच्या मार्गावर निंदा नाही तर प्रशंसा हे वीष आहे. कारण तिथेच अहंकार पुन्हा जागा होत असतो. जो प्रशंसेचे वीष पचवू शकतो तोच भगवान होऊ शकतो, असे प्रतिपादन घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म.सा. यांनी केले.

गोयल गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या महावीर गाथा या प्रवचनमालेचे तिसरे पुष्प त्यांनी गुंफले. तिसऱ्या दिवशी मरिचीच्या उत्कट भक्तीभावाची आणि त्याच्या मनात नंतर निर्माण झालेल्या अहंकाराची कथा कथन केली आणि उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. जीवनाचे अनेकाने मौलिक विचार या प्रवचनातून देतानाच जीवनाचा मुलभूत संदेशही दिला. प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, राजा सैनीच्या मुलाने नीलकुमारने दीक्षा घेतली. भगवान महावीर यांच्याकडे एक पद्धत होती.

ज्याने सर्वात अगोदर पहिल्यांदा दीक्षा घेतली त्याला झोपायला सुरुवातीला जागा मिळत असे आणि जो सगळ्यात लहान आहे. त्याला सगळ्यात शेवटी या नीलकुमारने नुकतीच दीक्षा घेतलेली त्यामुळे राजाचा मुलगा असूनदेखील त्याला सगळ्यात शेवटची जागा मिळाली. रात्री लोक उठायचे तेव्हा त्याच्या पायावर, पोटावर पाय पडत राहिले. त्याच्या मनात आले की आपण एक रात्र इथे काढू शकत नाही. आयुष्य कसे काढणार. त्यामुळे त्याने निर्धार केला की आपण सूर्योदय होताच निघून गेला. नीलकुमार भगवान महावीर यांच्याकडे जाण्यासाठी पूर्वपरवानगी घेण्यासाठी गेला.

पण सांगण्याची हिंमत होत नव्हती. तेव्हा भगवान महावीरांनीच त्याला काल जे त्याच्यासोबत घडले ते सांगितले आणि आज तो जाण्याची परवानगी मागायला आला आहे हे देखील सांगितले. त्यानंतर त्याला महावीरांनी त्याच्या पूर्वजन्माची कहाणी सांगितली. त्यानंतर नीलकुमारला पश्चाताप झाला आणि त्याने प्रायश्चित्त घ्यायची तयारी दाखवली. त्या उलट मरिचीने परवानगी न देता पाऊल उचलण्याचा विचार केला होता. आपण आयुष्यात किती चाललो हे महत्वाचे नसते तर आयुष्यातील टर्निंग पाॅइंटवर आपण नेमके कोणते पाऊल उचलतो याला अधिक महत्व असते.

कोणत्याही गोष्टीचे परिणाम वर्तमानात होत नाहीत तर ते भविष्यात होत असतात. जेव्हा आपण शिखराकडे जाण्याचा प्रवास करीत असतो तेव्हा घसरलेले एक पाऊल महत्त्वाचे ठरते. जमिनीवरून चालताना पडलात तर तुम्ही उभे राहू शकता पण जेव्हा शिखर चढताना पाऊल चुकते तेव्हा खाली घसरत येण्याशिवाय पर्याय उरत नसतो. जीवनातील सगळे मार्ग शिखराच्या प्रवासासाठी असतात. मरिचीने भगंवंताला न विचारता पहिले पाऊल उचलले नसते तर त्याचे भविष्य काय असते याचा विचार करा.

प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. पुढे म्हणाले, प्रभू सर्वदर्शी असतात. प्रभूशी संवाद साधताना शब्दांची गरज लागत नाही. मरिचीने तीर्थंकरासमोर आपल्या भावना जाहीर सभेत व्यक्त केल्या. ही दोन तीर्थंकरांची भेट होती. एक वर्तमानातील तीर्थंकर होते आणि एक भविष्यातील तीर्थंकर होते. मरिचीने खूप काळ दुर्लक्षित होणाऱ्या नजरा अनुभवलेल्या होत्या. पण मरिचीने प्रतिकूलतेतसुद्धा भक्तीमध्ये खंड येऊ दिलेला नव्हता. आज मात्र सगळी सभा त्याचा भक्तीभाव पाहून मरिचीला वंदन करू लागली होती.

भरत चक्रवर्तींनी जेव्हा मरिचीला प्रणाम केला आणि म्हणाले, मी तुझ्या वर्तमानाला नाही तर तुझ्या भविष्याला वंदन करतो आहे. त्या एका वाक्याने मरिचीच्या आतमध्ये जो अहंकार निपचित पडलेला होता तो त्याक्षणी जागा झाला. अहंकार कधीही संपत नाही. आपण महान आहोत आणि आपण आता तीर्थंकर, चक्रवर्ती बनणार असा अहंकार त्याच्या मनात उत्पन्न झाला. वाळवंटात राहून भक्ती करणे सोपे आहे, नंदनवनात राहून भक्ती करणे अवघड असते याची प्रचीती त्या सभेत येत होती.

अहंकाराने ग्रासलेल्या माणसाचे जे होते तेच मरिचीचे झाले. त्याला ऐकू येईनासे झाले. नरकाचे नाव जेव्हा ऐकले तेव्हा मरिचीला जाग आली. परंतु तोवर उशीर झालेला होता. प्रभूच्या चरणी असताना जेव्हा तुमच्या मनात अहंकार निर्माण होतो त्याचे परिणाम कित्येक जन्म भोगावे लागतात. गुरू आणि परमात्मा यांच्या समोर अहंकार दर्शन झाले तर जोवर मोक्ष मिळत नाही तोवर तुम्हाला त्याचे परिणाम भोगत राहावे लागतात. कोणत्याही दुःखी, आजारी व्यक्तीची उपेक्षा कधीही करू नका. तुम्ही केलेली उपेक्षा त्यांच्या मनात कितीतरी पाप निर्माण करतात.

एखाद्या वृद्धाश्रमाला तुम्ही भेट द्या. तिथे राहणारे आई वडील आपल्या मुलांना कसे कोसतात हे एकदा पाहून या. मरिची जेव्हा आजारी पडला तेव्हा त्याच्याजवळ कुणीही नव्हते. मरिचीकडून प्रेरणा घेऊन जे परमात्मा भक्तीमध्ये लीन झालेले लोक त्याला आठवले. त्यातला एखादा तरी आपल्या जवळ असायला हवा होता असे त्याच्या मनात आले. चांगले करूनही त्याला पश्चाताप होत होता. तुम्ही आयुष्यात काही चांगले करून त्याचा पश्चाताप मात्र करू नका, असे प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केली.

get_footer();