उच्चशिक्षितांनी नवोन्मेषक, व्यावसायिक नेतृत्व व्हावे- राज्यपाल
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
उच्चशिक्षित, पदवीधरांनी नोकरीच्या मागे न लागता नवोन्मेषक, उद्योजक, व्यावसायिक नेतृत्व आणि स्टार्टअप निर्माते बनावे. तसेच गरिबी, वंचितता, युद्ध, अस्थिरता आदी इतर कारणांमुळे समाजाच्या परीघावर जगणाऱ्यांचा विचार करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ लवळे येथे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या पदवीप्रदान सोहळ्यात रमेश बैस बोलत होते. यावेळी सिम्बायोसिसचे अध्यक्ष आणि संस्थापक तसेच सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका तथा विद्यापीठाच्या प्र- कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष बेबुकर सेक्का आदी उपस्थित होते.
पदवी प्रदान सोहळ्यात २६ विविध देशातील ८५ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट, पदवी, पदविका प्रदान करण्यात आल्या. या सोहळ्याच्या निमित्ताने स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. यावेळी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या देशाचे ध्वज राज्यपाल यांच्याकडे प्रदान करून एकत्रित केले.
रमेश बैस म्हणाले, तीस वर्षांपूर्वीनंतर पुणे हे माहिती तंत्रज्ञान शहर बनल्याने आज हे हजारो नोकऱ्या निर्माण करणारे आयटी हब बनले आहे. त्यामुळे स्नातकांनी नवीन कौशल्ये आणि हस्तांतरणीय क्षमता शिकणे महत्त्वाचे आहे.
कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानामुळे अनेक नोकऱ्या कालबाह्य होऊ शकत असल्या तरी नोकरीच्या अनेक नवीन संधीदेखील निर्माण करत आहे. आज या क्षेत्राशी परिचित असलेल्या पदवीधरांना नोकऱ्यांमध्ये नक्कीच एक अतिरिक्त फायदा होईल.
डॉ. मुजुमदार म्हणाले, स्नातकांनी पदवी प्राप्त करुन आपल्या देशात परतत असताना महात्मा गांधींच्या, गौतम बुद्धाच्या या देशाला आठवणीत ठेवावे. तसेच पुण्यासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलेल्या ऐतिहासिक शहराची आठवण ठेवावी. या देशातील ‘वसुधैव कुटुंबकम्’ चे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिम्बायोसिस संस्थेशी आठवणीच्या रुपाने कायम जोडले जावे.
या देशाने आपल्या व्यक्तीमत्वाला आकार दिला आहे. जगाला आपल्या संस्कृतीचे मूल्य समजण्याचा काळ आला आहे, असेही ते म्हणाले. डॉ. येरवडेकर म्हणाल्या, या विद्यापीठात आफ्रीकन- आशियाई देशातील विद्यार्थी शिकत असल्याने त्यांच्या पदवीनंतर त्यांच्या देशात मोठा मान मिळतो.
या विद्यार्थ्यांना येथील शिक्षणा बरोबरच भारतातील विद्यार्थ्यांनाही बहुविधतेचा, विविध देशातील संस्कृती समजून घेण्यात होतो. ते जागतिक नागरिक, जागतिक राजदूत बनतात. या वर्षी दुबईमध्ये सिम्बायोसिसचे कॅम्पस सुरू होत असल्याचेही त्या म्हणाल्या.
डॉ. रमण आणि. बेबुकर सेक्का यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सिम्बायोसिस विविध शैक्षणिक संस्थांचे अधिष्ठाता, संचालक आणि प्रमुख, विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी उपस्थित होते.
