कत्तलखान्याच्या खासगीकरणाविरोधात नागरिकांची एकजूट
मिलिंद एकबोटे : कत्तलखान्याचे ‘खासगीकरण’ हे दूध भेसळीचे कारण
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : कोंढवा कत्तलखान्याचे खासगीकरण अवैध व रद्दबातल ठरवण्यात यावे असे निवेदन गणेश मंडळाच्या पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी मिळून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना दिले. या वेळी कत्तलखान्यांचे खाजगीकरण हे समाजासाठी घातक असून ते दूध भेसळीचे प्रमुख कारण आहे अशी भूमिका अखिल भारतीय गाय संरक्षण संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी मांडली.
पुण्यातील कोंढवा कत्तलखान्याचे खासगीकरण करण्यास महापालिका अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. पू. आचार्य विरागसागरजी म.सा. आणि पु. वाणीभूषण प्रितिसुधाजी म.सा. यांच्या प्रेरणेने गणेश मंडळाचे सदस्य-कार्यकर्ते, अखिल भारतीय गोसंरक्षण संघटनेचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि समस्त महाजनचे महाराष्ट्र समन्वयक रमेश ओसवाल यांच्या सह हिंदी आघाडी, अखिल भारतीय कृषी गाय सेवा संघ, समस्त महाजन, गोरक्षण सामाजिक संस्था, शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेवा, अखिल कोंढवा खुर्द ग्रामस्थ, भा.ज.प. (अनुसूचित जाती मोर्चा) व जैन प्रकोष्ठ, समस्त हिंदू बांधव सामाजिक संस्था, श्री राधेकृष्ण लीलावती गोशाळा आणि आचार्य विनोबा भावे गोशाळा, कोयाळी यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोंढव्यातील चार हजार नागरिक व ३० सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निषेधाचे पत्रही दिले आणि अतिरिक्त आयुक्तांना निवेदनही दिले. यासोबतच या कत्तलखान्याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात ५० एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यात स्पष्टपणे शेती योग्य, दुग्धोत्पादन आणि प्रजनन क्षमता योग्य जनावरांच्या कत्तली करू नयेत असे नमुद केले आहे.
