आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ज्ञानमार्ग हा सर्वात कठीण मार्ग : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

Spread the love

पुणे : ईश्वराच्या आराधनेत आणि मोसुखप्राप्तीसाठी ज्ञानमार्ग हा सर्वात कठीण मार्ग आहे. आपली दृष्टी सम्यक असेल तर आपला पुढचा प्रवास योग्य दिशेने होत राहतो, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.

वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले. यांचे विचार ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, आपले जीवन तीन भागात विभागलेले आहे. एक शरीर, दुसरे वाणी आणि तिसरे मन आहे. शरीराच्या माध्यमातून आपण जे तप करतो, उपास करतो, यात्रा करतो तो क्रिया मार्ग किंवा कर्म मार्ग आहे. कर्म मार्ग सोपा नाही. शरीराशी आपले पहिल्यापासूनच प्रेमपूर्ण नाते असते.

त्या मार्गातून आपण कठोर साधना करू शकतो. दुसरा मार्ग आहे भक्तिमार्ग. त्यामध्ये स्तोत्र पाठ, ईश्वराचे स्मरण, मंत्रोच्चार, प्रार्थना यातून ईश्वराची आराधना केली जाते. ईश्वराच्या सद्गुणांचा आपल्यावर प्रभाव पडतो आणि ते गुण आपल्यातही यावेत असे आपल्याला वाटते.

जेव्हा हे आपल्यामध्ये येत जाईल तेव्हा जग आनंदी बनेल. जगातील दुःख, दैन्य, पीडा सारे काही कमी होऊन जाईल. म्हणून वाणीच्या माध्यमातून केली जाणारी भक्ती भक्तीमार्गात महत्त्वाची आहे आणि तिसरा मार्ग ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्ग हा सर्वात कठीण मार्ग आहे.

आपली दृष्टी सम्यक असेल तर आपला पुढचा प्रवास योग्य दिशेने होत राहतो. प. पु. साध्वी श्री शिलापीजी म्हणाल्या, साधू संत यांचे उद्दिष्ट मोक्ष मिळवणे हे असताना ते स्वर्गात सुद्धा जातात असे कसे होते. साधक नेहमीच, निष्काम राहू शकत नाही. साधू सामान्यांपेक्षा वर असतात पण ते प्रयत्न करूनही काही वेळा कमी पडू शकतात त्यांना देवगती प्राप्त होते.

आपण चांगले काम करीत राहावे आणि आपल्याकडून चुकीच्या कृती होऊ नयेत म्हणून आयुष्यात जागृती आवश्यक आहे. अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी देखील आपल्याला पुण्यकर्माची गरज आहे. आपण पुण्य वाढावे असे म्हणतो आणि पापाचा क्षय व्हावा म्हणतो ते यासाठीच.

त्यामुळे मोक्षाच्या मार्गावर जो साधक निघतो त्याने पाप कमीत कमी होत जाईल आणि पुण्याचा संचय होत जाईल यासाठी जागरूक राहणे आवश्यक असते. नऊ प्रकारची पुण्य असून त्या सगळ्या बाबतीत जागरूक असणे आवश्यक आहे. मन पुण्य या महत्त्वाचे आहे.

मनाला प्रसन्न आणि आनंदी ठेवणे हे सुद्धा पुण्याचं काम आहे. आयुष्यातील चांगल्या घटनांचे आवर्जून स्मरण करा. चांगल्या गोष्टी आपण विसरतो वाईट गोष्टी लक्षात ठेवतो. पाप बंधनातून मुक्त होण्याचे लक्ष ठेवा.

प्रयत्नपूर्वक चांगल्या बाबींचे स्मरण हे पुण्यकर्म आहे. अहंकार बाजूला ठेऊन चांगल्या कामाचे स्मरण ठेवावे. आपले गणित आणि ईश्वराचे गणित वेगळे आहे. कोणत्या मार्गावरून चालायचे हे आपल्याला ठरवावे लागते.