आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तरुणांनी समाजमाध्यमांच्या आहारी जाऊ नये : डॉ. पराग काळकर

Spread the love

पुणे : कुटुंबव्यवस्था आणि मूल्याधिष्ठित जीवनपद्धती ही भारतीयांची ओळख आहे आणि या दोन आधारांवर आपण जगाला आव्हान देऊ शकतो. मात्र, भारतीय तरुणांची सृजनशीलता समाजमाध्यमांमध्ये अडकवून ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणांनी समाजमाध्यमांच्या आहारी जाऊ नये, असा सल्ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी दिला.

श्री पूना गुजराती बंधू समाजतर्फे दहावी-बारावीमध्ये उच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन कोंढवा येथील जयराज स्पोर्ट्स अ‍ॅण्ड कन्व्हेन्शन सेंटरच्या देसाई बॅंक्वेट हॉलमध्ये करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. काळकर बोलत होते. व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष नितीन देसाई, कार्यकारी संचालक राजेश शहा, सह कार्यकारी संचालक नैनेश नंदू, उपाध्यक्ष वल्लभ पटेल, सचिव राजेंद्र शहा आणि खजिनदार हरेश शहा उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश शहा तर सूत्रसंचालन अनुजा सेलोत यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांना डॉ. काळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. डॉ. काळकर म्हणाले, “समाजमाध्यमे तुमची विचारप्रक्रिया खुंटवतात; तुमचे विचारविश्व प्रदूषित करतात.

तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे – आपण तंत्रज्ञानासाठी नाही, ही जाणीव प्रत्येक तरुणाने ठेवली पाहिजे. करिअरसाठी नवनवीन वाटा शोधताना पालक-शिक्षक मार्गदर्शन करतात; मात्र अंतिम निर्णय मुलां-मुलींनीच घ्यावा.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणव्यवस्थेत अभूतपूर्व लवचिकता आली असून व्यवसाय व छंद यांची सांगड घालता येते. वास्तू उभारताना जसा आराखडा करतो, तसाच निवडलेल्या क्षेत्राचा आराखडा तयार करून सातत्य राखल्यास यश निश्‍चित आहे. अपयश आले तरी ते विसरून पुढील संधीवर लक्ष केंद्रीत करा.”

अध्यक्ष नितीन देसाई म्हणाले, “गुजराती समाज उद्योजकतेसाठी प्रसिद्ध आहे. उद्योगाबरोबर बुद्धिजीवी क्षेत्रातही आपले उदाहरण प्रस्थापित करायला हवे. यशाला मर्यादा नसतात एक लक्ष्य पूर्ण झाल्यावर पुढचे ध्येय आपल्याला हाक मारते.

गुजरातमधील विद्यापीठांत बाहेरील राज्यातील विद्यार्थी शिकतात; परंतु गुजराती विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी आहे, हे चित्र बदलायला हवे.” समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश शहा, नैनेश नंदू, वल्लभ पटेल, राजेंद्र शहा, हरेश शहा यांच्यासह कार्यकारी मंडळाने परिश्रम घेतले.

get_footer();