आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नवदुर्गांच्या कार्यकर्तृत्वामुळे समाजकार्यासाठी उभारी : खासदार सुप्रिया सुळे

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider, Social • September 30, 2025
Spread the love

पुणे : घराच्या चार भिंतीत न अडकता महिला सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. समाजसेवेतही त्या आघाडीवर असून कोणताही गवगवा न करता अव्याहतपणे समाजसुधारणेसाठी झटत आहेत. हेच त्यांचे खरे मोठेपण आहे. या महिलांच्या कार्यकर्तृत्वातून आम्हालाही कार्यरत राहण्यास उभारी मिळते, शिकायला मिळते, असे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले.

अतिवृष्टीमुळे बळीराजावर मोठे संकट आले असून ते टाळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. भिलारेवाडी येथील श्री चामुंडा भवानी माताजी जैन मंदिरातर्फे स्त्रीशक्तीचा जागर करत ‘नवदुर्गा पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला. खासदार सुप्रिया सुळे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी होत या महिलांच्या कार्याचा गौरव केला.

मंदिराच्या सभामंडपात झालेल्या या कार्यक्रमात चामुंडा भवानी माताजी जैन मंदिर महिला आघाडीच्या अध्यक्षा पुष्पा कटारिया यांच्या हस्ते महिलांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया, मंदिराचे संस्थापक अध्यक्ष राजेश नाहर, पूना मर्चंट चेंबरचे उपाध्यक्ष अजित बोरा, सुभाष नाहर आणि अंजली नाहर व्यासपीठावर उपस्थित होते.

या सोहळ्यात रत्नप्रभा खाबिया (समाजसेवा), कमलाबाई कर्नावट (धार्मिक, सामाजिक), निना नाहर (आरोग्यसेवा), ममता नाहर (अवयवदान जागृती), सुषमा नाहर (समाजसेवा), रेश्मा नाहर (शैक्षणिक), सोनल गांधी (क्रीडा), पल्लवी भटेवरा (आरोग्य क्षेत्र), पूजा गडा (मानसिक आरोग्य) या महिलांचा सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकात राजेश नाहर यांनी मंदिराच्या स्थापनेविषयी माहिती दिली. तसेच संस्थानतर्फे चालविल्या जाणाऱ्या शैक्षणिक, आरोग्य व सेवा क्षेत्रातील उपक्रमांविषयी उपस्थितांना अवगत केले. महिलांनी घरातील जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत कामगिरी केली असून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा यथोचित सन्मान करण्याच्या हेतूने ‘नवदुर्गा पुरस्कार’ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्ना दहिवेलकर यांनी केले.

get_footer();