आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुणे मनपा अग्निशमन दलात पहिल्यांदाच महिलेची निवड

Spread the love

मेघना सकपाळ हिने १३६ वर्षांनी रचला इतिहास

पुणे : शहराच्या इतिहासात तब्बल १३६ वर्षांनंतर मनपा अग्निशमन दलात “फायरमन’ म्हणून महिला कर्मचाऱ्याची निवड झाली आहे. तर, मनपा स्थापनेच्या ७४ व्या वर्षी पहिल्यांदाच महिलेस या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. मेघना सकपाळ असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

ज्या पुणे शहरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची दरवाजे उघडले, त्याच पुण्यात अग्निशमनदलात एकही महिला कर्मचारी “फायरमन’ नाही याची दखल घेत राज्य महिला आयोगाने याचा अहवाल महापालिकेकडून मागवला होता.

तसेच “फायरमन’च्या भरतीत महिलांसाठी राखीव जागा ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिकेने राबवलेल्या भरती प्रक्रियेत २०० पैकी ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव होत्या. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात मेघना सकपाळ यांची निवड करण्यात आली आहे. मेघना यांचे आजोबा सदाशिव सकपाळ हे अग्निशमन दलाकडून सेवानिवृत्त, तर वडील महेंद्र सकपाळ हेदेखील सध्या “फायरमन’ पदावर कार्यरत आहेत.

“मी आज खूप खुश आहे. पुणे अग्निशमन दलात जवान म्हणून निवड होणारी मी पहिली महिला आहे. माझे आजोबा येथूनच सेवानिवृत्त झाले. माझे वडील आता फायरमन आहेत. बाबांसोबत काम करण्याचा आनंद मिळेल. माझी आई हयात असती तर तिलाही आनंद झाला असता.” – मेघना सकपाळ, ‘फायरमन’

get_footer();