आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यातील पूरबाधितांना नुकसान भरपाई मिळणार तरी कधी ?

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), News, News Slider, Social • August 2, 2024
Spread the love

पुणे : पूरस्थितीत पुराचे पाणी दोन दिवस घरात साचून राहिलेले असेल, तरच संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळते. पुण्यात गेल्या आठवड्यात पूर आला, तेव्हा पूर आलेल्या बहुतांश भागांत अशी स्थिती नसल्याने पुण्यातील पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळणार का, मिळणार तरी कधी? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

पुण्यात२५ जुलै रोजी शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने शासकीय यंत्रणात समन्वय नसल्यानेपुणे व परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, हवेली आणि भोर तालुक्यांतील ४,४३५ नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले.

एखादा परिसर दोन दिवसांहून अधिक काळ पाण्याखाली असेल, तरच सरकारकडून पाच हजारांची मदत मिळते, असा निकष आहे. पुण्यातील पूरग्रस्त या निकषांत बसत नाहीत. कारण, २५ जुलै रोजी पुराचे पाणी घरांत शिरल्यानंतर काही तासांत या पाण्याचा निचरा झाला होता. मात्र, राडारोडा आणि चिखल साफ करण्यासाठी पुढील काही दिवस लागले.

आता तांत्रिकदृष्ट्या घरांत दोन दिवस पाणी साचून राहिले, तरच मदत मिळत असल्याने या निकषांत थोडे बदल झाले, तरच पूरग्रस्त पुणेकरांना मदत मिळेल, अशी स्थिती आहे. दरम्यान, पुण्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

मनुष्यहानी, पशुधन हानी, घरांत पाणी शिरल्याने झालेले नुकसान, घरांचे नुकसान, झोपड्या आणि गोठ्यांचे नुकसान याकरिता आठ कोटी २३ लाख ६७ हजार ५०० रुपयांच्या निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाकडे करण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली.

राज्य सरकारकडे नुकसान भरपाईबाबतचा अहवाल पाठविला आहे. शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर संबंधितांना त्याचे वाटप करण्यात येईल.अशी माहिती ज्योती कदम, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली.

get_footer();