आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रमुख रस्ते रविवारी दुपारनंतर वाहतुकीस बंद

Spread the love

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‌गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पांढरीकडे प्रस्थान झाले असून दोन्ही सोहळ्यांचे रविवारी (दि.३०) शहरात आगमन होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. पालखी आगमनानिमित्त रविवारी दुपारनंतर शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत.

पालख्यांच्या आगमनानिमित्त शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सोलापूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक चौफुला आणि थेऊरमार्गे वळवली आहे. तर सासवडकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक नारायणपूर, कापूरहोळमार्गे वळवण्यात आली आहे.

३० जून रोजी पालखी आगमन आणि २ जुलै रोजी पालखी प्रस्थानावेळी संपूर्ण पालखी मार्गावर येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. पालखी मार्गस्थ झाल्यानंतर वाहतुकीस रस्ते खुले करून देण्यात येणार आहेत.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी आगमनानिमित्त रविवारी आवश्यकतेनुसार बोपोडी चौक, खडकी रेल्वेस्थानक, मरीआई गेट चौक, कमलनयन बजाज चौक, जुन्या मुंबई- पुणे मार्गावरून पुण्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमनानिमित्त कळस फाटा ते विश्रांतवाडी चौक, येरवडा येथील मनोरुग्णालय (मेंटल कॉर्नर) ते आळंदी रस्ता चौक, चंद्रमा चौक ते आळंदी रस्ता, नवीन डॉ. आंबेडकर सेतू ते चंद्रमाचौक, होळकर पूल ते साप्रस चौकीपर्यंत वाहतूक बंद राहील.

या कालावधीत फक्त आळंदीकडे जाणारे रस्ते आवश्यकतेनुसार बंद राहणार असून, अन्य रस्ते सुरू राहणार आहेत. शहरात पालख्यांचे आगमन झाल्यानंतर दोन्ही पालख्या एकाच मार्गावरून त्यांच्या मुक्कामस्थळी पोहोचतील.

अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, संचेती चौक, वैधशाळा चौक, वीर चापेकर चौक, ज्ञानेश्वर पादुका चौक, तुकाराम पादुका चौक, गोखले स्मारक चौक (गुडलक), खंडोजी बाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता, विजय चित्रपटगृह चौक, सेवासदन चौक, बेलबाग चौक, बुधवार पेठ , पासोबा विठोबा चौक, मोती चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, हुल्या मारुती चौक, नाना पेठ पोलिस चौकी येथून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी अरुणा चौक मार्गे श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामास येईल.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी अशोका चौकमार्गे भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामास येईल, पालख्यांच्या मुक्कामानिमित्त नाना-भवानी पेठेतील वाहतुकीत बदल केले जाणार आहेत.

get_footer();