बाणेर येथे ३६ वर्षीय युवकाचा खून
चतुश्रृंगी पोलीस स्टेशन : आरोपी अजून फरार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : वाकड येथील युवकाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात जड वस्तू घालून खून केल्याची घटना धनकुडे वस्ती सर्वे नं. २७/४ रामदास धनकुडे यांच्या मोकळ्या जागेत बाणेर येथे घडली आहे.
नाना विठठल चादर (वय ३६ वर्षे, रा. वाकड गावठाण वाकड पुणे) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा भाऊ सचिन चादर (वय ३४,रा. वाकड, पुणे) याने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
धनकुडे यांच्या मोकळ्या जागेत ७ जूनच्या रात्री काही जन दारू पीत बसले असावेत, त्यावेळी त्यांच्यात झालेल्या वादातून एकाने नाना चादर च्या डोक्यात दगडासारखी जड वस्तू घालून मारहाण केली असा प्राथमिक अंदाज आहे.
शनिवारी ही घटना उघडकीस आली. भावाचा मोबाईल लागत नसल्याने फिर्यादी त्याच्या शोधात तिथे पोहचला असता, त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी मृताचा भाऊ सचिन चादर याने फिर्याद दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरु असून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच पोलीस आरोपीला अटक करतील अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांनी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क शी बोलताना दिली.
