आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महावीर समजून घेणे हीच परिवर्तनाची यात्रा : प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.

Spread the love

‘महावीरगाथा’चे दुसरे पुष्प अलोट गर्दीत संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल

पुणे : भगवान महावीरांना समजून घेणे हीच परिवर्तनाची यात्रा आहे. जो महावीरांचा शोध घेऊ शकेल तो स्वतः महावीर बनू शकतो. महावीरांची कथा ही घाबरून जगणाऱ्यांची नाही तर वीर, शूरांची कथा आहे, असे उद्गार घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी काढले.

गोयल गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या महावीरगाथा या प्रवचनमालेचे दुसरे पुष्प त्यांनी गुंफले. पहिल्या दिवशी सांगितलेल्या नैसारच्या कथेचा विस्तार करीत त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. जीवनाचे काही मौलिक विचार या प्रवचनातून त्यांनी दिले. चक्रवर्ती भरत यांचे विलक्षण आयुष्य आणि त्यांचे महान कर्तृत्व, चक्रवर्ती भरत यांचा पुत्र मरूची याने चक्रवर्ती बनण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले याची कथा प. पु. प्रवीणऋषिजी म.सा. यांनी कथन केली.

प. पु. प्रवीणऋषिजी म.सा. उद्बोधन करताना म्हणाले, प्रभू रामचंद्राचे किंवा कृष्णाचे जीवन आपल्याला चटकन समजते पण भगवान महावीरांचे जीवन समजून घ्यायला वेळ लागतो. कारण महावीरांसमोर कुणी रावण उभा ठाकलेला नव्हता, ते एखाद्या कंसाला मारायला ते कुठे गेलेले नव्हते. महावीर हे बनत गेले. बीजाचे रुपांतर फळात होते, तशी ती प्रक्रिया होत गेली. हा प्रवास आपण समजून घ्यायला हवा. जोपर्यंत आपल्याला प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वर दिसणार नाही तोपर्यंत आपण अंधारातून बाहेर आलो असे म्हणता येणार नाही.

तुम्हाला इतरांमध्ये काय दिसते, व्यक्ती जशी आहे तशी दिसते, की जशी तुम्हाला वाटते तशी दिसते, की ती जी असू शकते तशी तुम्हाला दिसते. आपण व्यक्तीला पाहिल्यानंतर त्याच्यात भूतकाळ शोधतो परंतु ज्योतिषी नसतानाही ज्याच्याकडे व्यक्तीचे भविष्य पाहण्याचे सामर्थ्य असते ते संत किंवा ईश्वर बनतात. एखाद्या मूर्तीत ईश्वर तेव्हाच दिसतो जेव्हा तुम्ही श्रद्धेच्या भावनेने त्याकडे पाहता. जेव्हा तुम्ही जिवंत माणसाकडेसुद्धा त्याच श्रद्धेच्या भावनेने पाहाल तेव्हा त्यातही तुम्हाला ईश्वराचेच दर्शन होईल.

ज्यावेळी अशा दृष्टीने व्यक्ती प्रत्येक व्यक्तीकडे श्रद्धाभावाने पाहू लागते तेव्हा त्या व्यक्तीमध्ये नैसार या शिष्याचा जन्म होतो. या आंतरिक परिवर्तनाची सुरुवात कशी झाली हे समजावे म्हणून काल नैसारची कथा सांगितली. महावीर होण्याची यात्रा तिथून प्रारंभ होते. जीवनातील आस्था जेव्हा संपली होती, सगळीकडे अंधकार दाटलेला होता अशा वेळी नैसारने जीवनात पहिल्यांदा प्रकाश पाहिलेला होता. भगवान महावीरांना समजून घेणे ही परिवर्तनाची यात्रा आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे.

महावीरांचा जो शोध घेऊ शकेल तो स्वतः महावीर बनू शकतो. ज्यांच्याकडे कुठे पोहोचायचे याचे लक्ष्य असते त्यांनाच रस्ते सापडतात. त्यामुळे ज्यांना कुठे जायचे हेच माहित नाही ते कुठेही पोहोचत नाहीत. आपल्या आयुष्याचे काही ध्येय आहे का हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारून पाहायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर, बाबा आमटे अशा अनेकानेक व्यक्तींपुढे जीवनाचे ध्येय होते म्हणूनच त्यांच्याकडून मोठे कार्य उभे राहू शकले.

आयुष्याला ध्येय लाभते तिथून जीवनाची खरी सुरूवात होते. ज्याला ध्येय नाही त्याची अवस्था महाभारतातील धृतराष्ट्रासारखी असते. उत्तम ते वेचत राहावे, उत्तम ते वेचता वेचता श्रेष्ठतम बनत जावे. प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. म्हणाले, तपश्चर्या करण्यापेक्षा भक्ती करणे अवघड आहे, प्रभू रामचंद्रांची उत्कट भक्ती करणाऱ्या हनुमंतांना प्रभू रामचंद्रांकडून काहीही नको होते. त्यांना फक्त प्रभू रामचंद्र हवे होते. ही उत्कटता भक्तीत असते.

जेव्हा तुम्ही इतरांना सन्मान देता तेव्हा तुमच्या मुलांना तुम्ही तोच संस्कार देत असता. मी जिंकण्यासाठी प्रयत्न करतो, मी जिंकणारच हा विश्वास मनात बाळगायला हवा. ऋषभदेवाचा पहिला मुलगा भरत याच्यावरून देशाचे नाव “भारत” पडले ही वस्तुस्थिती असतानादेखील त्याचा कुठेही उल्लेख पुस्तकात नाही. शकुंतला आणि दुष्यंत यांचा मुलगा भरत याच्या नावावरून देशाचे नाव भारत पडले असे म्हटले आहे परंतु त्यांच्या अगोदरपासून हा देश भारत होता याचा विसर पडला आहे.

परंतु हे सत्य लपवण्याचे कारस्थान आणि षडयंत्र रचले जाते आहे, असे परखड प्रतिपादन प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी केले. सहा खंडांमध्ये एकच शासन निर्माण करण्याचे महान कार्य भगवान ऋषभदेव यांचा मुलगा भरत यांनी केले. म्हणून त्याचा विसर आपण तरी पडू देता कामा नये. ज्यांच्याकडे भारत राजाचा इतिहास आहे तेच उद्याचे भविष्य निर्माण करू शकतात,  असे  ते  म्हणाले.

get_footer();