आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मेहनतीनेच रुजेल यशाचे बीज : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), News, News Slider • August 3, 2024
Spread the love

पुणे : तीर्थंकर आपल्या संसारातून मुक्तीचा उपाय आणि मोक्षाचा मार्ग सांगतात. संसारात आपल्या आयुष्यात कोणती साधने आवश्यक आहेत हे सुद्धा त्यांनी सांगितले. मेहनत कराल तेव्हाच ते बीज रुजेल आणि भविष्यात यशाचा वृक्ष बनेल हा संदेश त्यांनी दिला आहे तो आपण जीवनात अनुसरायला हवा, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले.

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी मार्गदर्शन केले. या वेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी म्हणाल्या, जीवनात आपल्या सुरक्षेची जी साधने आहेत ती आपल्याला प्रथम तीर्थंकर ऋषभदेव यांनी सांगितली. आपल्या २४ तीर्थकरांपैकी भगवान ऋषभदेव हे एकमेव तीर्थंकर आहेत ज्यांनी आपल्याला चरितार्थासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी शिकवल्या.

सामान्य जनतेचे जीवन सुखी व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु माणसाचे जीवन जसे सुखी झाले तसे त्याचे जीवन पुन्हा विषमतेने भरून गेले. म्हणून धर्माची स्थापना करणे आवश्यक बनले. पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी पुढे सांगितले की, आपण सकाळपासून किती शब्दांचा वापर केला आहे हे पाहायला हवे.

शब्द आपण बोलत राहतो. शब्दांचे हे भंडार आपण भरतच राहतो. आपल्या जीवनात आनंद हा आपला स्वभाव आहे. आज जितके आनंदी आहोत तसेच उद्याही होऊ शकता कारण तो अनंत स्वभावात आहे. तरीही आपल्याला भविष्याची चिंता लागून राहिलेली असते.

जैन तत्त्वज्ञान हे एक सुंदर ज्ञान आपल्याला प्राप्त झालेले आहे. अनंत आकाशाप्रमाणे अनंत गोष्टी आपल्याकडे आहेत. प. पु. साध्वी शिलापीजी यांनी अन्यत्व भावनेविषयी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, आंतरधर्मीय लग्ने ही आज एक वेगळीच सामाजिक समस्या बनत चालली आहे.

आज मुले अनेक प्रकारच्या तणावाखाली आहेत. परंतु जिथे जिथे अडचण येथे तिथे मुलांना मार्गदर्शन गुरू करू शकतात. आई वडिलांपेक्षा तिथेच मुले मोकळेपणाने बोलतात. ताई माँ यांच्याशी गेल्या अनेक वर्षांत हजारो मुले जोडली गेलेली आहेत. ती त्यांच्या समस्या मन मोकळेपणाने सांगतात.

आपल्याकडे गुरू असल्याने आपल्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याची गरज अजिबात लागत नाही. आपला मार्ग करुणेचा आणि क्षमेचा आहे. आपण कोणत्या मार्गाने जायचे हे आपल्यालाच ठरवायचे आहे.

आपले मन प्रांजळ असेल तेव्हाच आपल्याला अनंततेची अनुभूती होईल. परंतु आपले मन कचऱ्याने भरलेले आहे. भविष्याची चिंता आहे. आपले मन शांत होईल तेव्हाच आपल्या अनंत चैतन्याचे दर्शन आपल्याला होईल.

get_footer();