राजु गायकवाडवर स्थानबध्दतेची कारवाई
पी.सी.बी. गुन्हे शाखेचा दणका
पुणे: हडपसर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या राजु गायकवाड गुन्हेगारावर स्थानबध्दतेची १०० वी कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
राजु गायकवाड,(वय. ३९ रा. लेन नं.०७ कॅनॉल शेजारी, गंगानगर, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला कोल्हापुर मध्यवर्ती कारागृह, कोल्हापुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालयातील हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ४ वर्षामध्ये त्याच्याविरूध्द ७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीवनाचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, व पी.सी.बी. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाचक शाखा गजानन पवार, पी.सी.बी गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक राजु बहिरट, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेखर कोळी, सहायक पोलीस उप-निरीक्षक वाचक शाखा, दिलीप झानपुरे, पोलीस अंमलदार योगीराज घाटगे, अविनाश सावंत, संतोष कुचेकर, सागर बाबरे, अनिल भोंग यांनी पार पाडलेली आहे. पोलीस आयुक्त यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय गुन्हेगारांवर १ वर्षाच्या कालावधीमध्ये स्थानबध्दतेच्या एकूण १०० कारवाया केलेल्या आहेत. त्यामध्ये एकूण १०० आरोपींना महाराष्ट्र राज्यामधील विविध कारागृहामध्ये स्थानबध्द करण्यात आलेले आहे.
