आवृत्ती पुणे
← Back to Homepage

‘राज्य महिला आयोग’ गुरुवारी सातारा जिल्हयात

Spread the love

तक्रारी मांडण्याचे अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे महिलांना आवाहन

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत सातारा जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी गुरुवार दि. २७ जूनरोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.

आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि सदस्य सचिव माया पाटोळे तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. सातारा जिल्हयात होणाऱ्या या जनसुनावणीत महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा, रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हास्तरावर जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचें निवारण करण्याचा प्रयत्न आहे.

जनसुनावणीनंतर महिला व बालकांच्या विषयांच्या अनुषंगाने सातारा जिल्हयाची आढावा बैठक होईल. यावेळी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच कामगार आयुक्त, आरोग्य, परिवहन, शिक्षण आदी विभागाचे अधिकारी उपस्थित असतील. उपरोक्त सर्व कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहेत.

महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याच काम आयोग करत आहे.

get_footer();