वशीकरणाचे प्रयोग करणाऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
पतीचे आईवडील, मुलगी यांच्या मरणाची केली कामना : खराडी पोलिसांनी केला गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : तिचे त्याच्याबरोबरचे तिसरे लग्न, तर त्याचे दुसरे लग्न. दोघांचे एक मुलगा व मुलगी त्यांच्याबरोबर राहत होते. ड्रग्ज प्रकरणात महिलेचा मुलगा तुरुंगात गेल्याने ती माहेरी निघून गेली. तेव्हा आपल्याला आई-वडील आणि पहिल्या पत्नीच्या मुलीपासून तोडण्यासाठी पत्नी वशीकरण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत योगेश सतेंद्र धुत (वय ४७, रा. गेरा ट्रिनिटी टॉवर, ग्रॅट रोड, खराडी) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी त्यांची पत्नी तुलिका योगेश धुत (वय ४४, सध्या रा. सुंदरनगर, मालाड पूर्व) यांच्यावर जादूटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गेरा ट्रिनिटी टॉवर येथे २५ मे २०२० ते २१ नोव्हेंबर २०२४ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश धुत यांनी तुलिका धुत हिच्याशी दुसरे लग्न केले आहे. तुलिका धुत यांचे हे तिसरे लग्न आहे. योगेश यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे, तर तुलिका यांना पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे.
हे सर्व जण व योगेशचे आई-वडील एकत्र राहत होते. वेगळे राहण्यासाठी तिने हट्ट केल्याने ते आई-वडिलांपासून वेगळे राहू लागले. दरम्यान, त्यांच्यात वादावादी होत होती. तुलिका धुत हिच्या मुलावर अंमली पदार्थ प्रकरणात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी तुलिका हिच्या मुलाला अटक केली. तेव्हापासून योगेश हे आपल्या मुलीसह आई-वडिलांकडे राहू लागले. या प्रकारामुळे त्यांच्यामध्ये भांडणे होऊन तुलिका माहेरी निघून गेली. दरम्यान, तुलिका माहेरी गेल्याने ते एकत्र राहत असलेल्या फ्लॅटमध्ये योगेश गेले असता, त्यांना जळालेल्या मिरच्या, लिंबू, कापूर अशा वस्तू मिळाल्या.
तसेच तुलिकाची एक वही मिळाली. वहीतील मजकूर वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, त्यांची दुसरी पत्नी तुलिका ही योगेश यांना मुलगी, आई-वडील यांच्यापासून विभक्त करण्यासाठी त्यांच्यावर वशीकरण करत होती.
योगेश व त्यांच्या कुटुंबामध्ये भांडणे लावण्याच्या उद्देशाने ती कारस्थाने करत होती. योगेश यांच्या आई-वडील व मुलगी यांच्या मरणासाठी संकल्प करत होती. अशा प्रकारे ती अमानुष, अनिष्ट प्रथा व जादूटोणा करत असल्याचे आढळून आले. खराडी पोलिसांनी जादूटोणा कायद्याखाली गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करीत आहेत.
