१९ व्या मजल्यावरून पडून बांधकाम कामगाराचा मृत्यू
वीरकर बिल्डरसह साईट सुपरवायझर : लेबर कंत्राटदारावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बाणेर येथे सुरू असलेल्या इमारतीच्या १९ व्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. सुरक्षा साधने न पुरविल्याच्या कारणावरून पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक वीरकर, साईट सुपरवायझर आणि लेबर कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
रागीब एहसान रकीब (वय १९, सध्या रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत रागीब याचा भाऊ मोहम्मद एहसान रकीब (वय २१, सध्या रा. पॅनकार्ड क्लब रस्ता, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रोडवरील वीरकर सेव्हन साईट येथे २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली.
बाणेर येथील पॅनकार्ड क्लब रोडवर वीरकर बिल्डर यांची ‘वीरकर सेव्हन’ ही २४ मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. रागीब रकीब हा स्लॅबसाठी बाहेरील बाजूला लोखंडी सांगाडा उभारण्याचे काम करत होता. १९ व्या मजल्यावर काम करत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला.
रागीब याने हेल्मेट घातले होते. इतक्या उंचावर काम करत असतानाही त्याला सेफ्टी बेल्ट दिला नव्हता. तसेच सुरक्षिततेची जाळी योग्य प्रकारे लावण्यात आली नव्हती. त्यामुळे तो १९ व्या मजल्यावरून थेट खाली जमिनीवर कोसळून त्यात त्याचा मृत्यू झाला.
बांधकाम व्यावसायिक, साईट सुपरवायझर व लेबर कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक थिटे तपास करीत आहेत.
